‘लोकसंवाद 2026 अंतर्गत महाराणा प्रताप गणेशोत्सव प्रतिष्ठानमध्ये महिला व सायबर सुरक्षेबाबत जनजागृती

shivrajya patra

सोलापूर : जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोधी गल्ली, सोलापूर येथील महाराणा प्रताप गणेशोत्सव प्रतिष्ठान तरुण मंडळात ‘लोकसंवाद 2026’ उपक्रमांतर्गत महिला सुरक्षा आणि सायबर सुरक्षा या विषयांवर जनजागृती करण्यात आली. यावेळी महिलांची सुरक्षितता, उपलब्ध कायदेशीर संरक्षण तसेच डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.


सायबर फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, संदेश किंवा संशयास्पद लिंक याबाबत सतर्क राहणे, ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती यांसारखी गोपनीय माहिती कोणाशीही शेअर न करणे, तसेच ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक दक्षता घेणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने उपलब्ध कायदेशीर तरतुदी, सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी आणि अडचणीच्या प्रसंगी मदत घेण्याच्या उपलब्ध मार्गांची माहितीही देण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद 2026’ उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करण्यात आला.


तसेच ‘बाप्पा डॉट ओआरजी’ या डिजिटल उपक्रमाची माहिती देऊन गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मंडळाची माहिती, छायाचित्रे, व्हिडिओ, रील्स व विविध उपक्रमांची माहिती डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय घोडके यांनी केले, तर दिलीप कोकाटे यांनी आभार मानले. 


यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश किशनसिंग आंबेवाले, उपाध्यक्ष अर्जुन बबनसिंग बॉम्बेवाले, खजिनदार आकाश बडूरवाले, सचिव अशोक कैयावाले तसेच किशोर कैयावाले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

0000

To Top