सोलापूर : मानवतेची नि:स्वार्थ सेवा आणि सामाजिक सौहार्द वृद्धिंगत करण्याचे ध्येय केंद्रस्थानी ठेऊन कार्यरत 'जॉईन फॉर पीस' संस्थेच्या 'जेपी शांतता पुरस्कार' घोषित करण्यात आले. या वर्षीच्या 'जेपी शांतता पुरस्कार 2026' च्या मानकऱ्यांत माजी आमदार प्रकाश यलगुलवार, ज्येष्ठ समाजसेवक जाहिद शेख (पुणे), नगरसेवक अमोल शिंदे (सोलापूर महानगरपालिका), सरपंच विजय राठोड (मुळेगांव तांडा) आणि आपुलकी प्रतिष्ठान (सांगोला) या सामाजिक संस्थेचा समावेश असल्याचं सांगण्यात आलंय.
मानवतेची नि:स्वार्थ सेवा आणि सामाजिक सौहार्द वृद्धिंगत करण्याचे ध्येय बाळगणारी 'जॉईन फॉर पीस' ही अग्रगण्य स्वयंसेवी संस्था आहे. समाजातील विविध घटकांमध्ये एकोपा निर्माण करणे आणि शांतता, समता, बंधुता तसेच मानवी हक्कांची जपणूक करणे, हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
समता आणि बंधुता या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवता जोपासण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना मागील 07 वर्षांपासून 'जेपी शांतता पुरस्कार' देऊन गौरविण्यात येत आहे.
समाजात शांतता आणि बंधुभाव नांदावा यासाठी संस्था सातत्याने कार्यरत असून, याच उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रतिवर्षी जागतिक शांतता दिनी, 21 सप्टेंबर रोजी जेपी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पुरस्कार वितरणाचं यंदाचं सातवं वर्ष आहे.
सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ अ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार वितरण आणि सोहळा जागतिक शांतता दिनी सोमवारी, 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 06.30 वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात ( श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर, सोलापूर) येथे मान्यवरांच्या व निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी चेअरमन तथा विद्यमान सदस्य अॅड. मिलिंद थोबडे यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात येतील, अशी माहिती पुरस्कार निवड समितीने दिली आहे. या पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व मान्यवरांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
या गौरव सोहळ्यास सामाजिक सलोखा आणि शांतताप्रेमी नागरिकांनी बहुसंख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन 'जॉईन फॉर पीस' चे अध्यक्ष प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला आणि सचिव प्रा. जैनुद्दीन पटेल यांनी केलं आहे.
