येथील मुरारजी पेठ, छ्त्रपती शिवाजी महाराज चौकातील हॉटेल व्यावसायिक 67 वर्षीय एकनाथ सोपान घाडगे (रा.मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी, 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 07.45 वा. च्या सुमारास नेताजी शिंदे याने णेशोत्सव मंडळाच्या नावाने 03 लाख रुपयांची वर्गणी एकनाथ घाडगे यांच्याकडं मागितली.
मंडळाच्या 500 कार्यकर्त्यांना, ड्रेस करिता 500 आणि टेलरला देण्यासाठी प्रत्येकी 600 रूपये याप्रमाणे एकूण 3, 00, 000 रूपयांची वर्गणी असल्याचंही सांगण्यात आलं.
त्यावर एकनाथ घाडगे यांनी, त्यांची 03 लाख रूपये देण्याची आर्थिक परिस्थीती नसल्याचं सांगून सालाबादप्रमाणे 25, 000 रूपये वर्गणी देण्याची तयारी दर्शविली. त्यावेळी यापूर्वी मंडळाला 2, 00, 000 रूपये दिले आहेत, असं नेताजी शिंदे याला सांगून समजावण्याचाही प्रयत्न केला.
मात्र, नेताजीनं 03 लाख रूपये देण्याचा ठेका कायम ठेवत एकनाथ घाडगे यांच्या अंगावर येऊन शिवीगाळ केली. ती रक्कम न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली, त्यामुळे घाडगे घाबरून चक्कर येऊन पडल्याचं तक्रारीत नमूद असल्याचं दिसतंय.
यासंबंधीची माहीती मिळताच वपोनि महादेव राऊत यांनी तात्काळ दखल घेऊन फौजदार चावडी पोलीस ठाण्यात क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळाचे सदस्य नेताजी शिवाजी शिंदे (रा.निराळे वस्ती, सोलापूर) याच्याविरुद्ध BNS कलम 308 (4), 351(3), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-01) अरूण देवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मागदर्शनाखाली स.पो.नि. ज्ञानेश्वर पाटील आणि फौजदार चावडी पोलीस स्टेशनकडील अधिकारी-अंमलदार यांनी पार पाडली.
उत्सव वर्तुळात या घटनेकडं खळबळजनक प्रकार म्हणून पाहिलं जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.
***
- : नागरिकांना आवाहन : -
नागरीक यांना आवाहन करण्यात येते की, धार्मिक किंवा सार्वजनिक उत्सवासाठी वर्गणी देण्याबाबत कोणी जबरदस्ती करीत असल्यास, वर्गणी पैशांसाठी धमकावत असल्यास किंवा शिवीगाळ करून त्रास देत असल्यास यासंबंधीची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास द्यावी. गणेशोत्सव मंडळांनी नागरिकांकडून स्वेच्छेने दिली जाणारी वर्गणी स्वीकारून उत्सव शांततेत व सलोख्याने साजरा करावा. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे.
- महादेव राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर.
-----
