पुणे शहरात शिवसेना अल्पसंख्यांक विभागाची जोरदार वाटचाल
250 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; 25 ते 30 जणांवर विविध पदांची जबाबदारी
पुणे : पुणे शहरात शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संघटनात्मक कार्यक्रमात तब्बल 250 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी 25 ते 30 कार्यकर्त्यांवर विविध संघटनात्मक पदांची जबाबदारी सोपविण्यात आली.
माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सलाउद्दीन शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला पुणे शहर अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष साकीब भाई आबाजी, शहर कार्याध्यक्ष आसिफ खान मोहम्मद अली सय्यद समी घोलप, अल्ताफ शेख बहुसंख्य यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“2029 मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आजपासून तयारीला लागा”
यावेळी मार्गदर्शन करताना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सलाउद्दीन शेख म्हणाले, “2029 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना पाहायचे असेल, तर त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच तयारीला सुरुवात केली पाहिजे. संघटन मजबूत करून शिवसेनेचा विचार महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारावी.”
अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांवर बोलताना शेख म्हणाले, “आजच्या परिस्थितीत अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना हा एक सक्षम राजकीय पर्याय आहे. काही लोक केवळ दिशाभूल करणारी वक्तव्ये करून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी विविध पातळ्यांवर काम सुरू आहे.”
“पुण्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा”
पुणे शहरातील अल्पसंख्यांक विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सलाउद्दीन शेख यांनी शहरातील विविध भागांत शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले, “पुणे विभागात माजी आमदार तथा शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांचा आपल्याला संपूर्ण पाठिंबा आहे. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करावे. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय आणि जबाबदारी देण्याची भूमिका पक्षाचे नेतृत्व निश्चितपणे पार पाडेल.”
पश्चिम महाराष्ट्रभर संघटन विस्ताराचे अभियान
पश्चिम महाराष्ट्र प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सलाउद्दीन शेख यांनी पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांचा दौरा सुरू केला आहे. अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांतील इच्छुकांना शिवसेना अल्पसंख्यांक विभागाशी जोडण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानातील पहिला दौरा पुणे येथे आयोजित करण्यात आला.
पुण्यातील कार्यक्रमात झालेला मोठ्या संख्येतील कार्यकर्त्यांचा प्रवेश आणि पदवाटप यामुळे शहरातील शिवसेना अल्पसंख्यांक विभागाच्या संघटनात्मक विस्ताराला मोठी चालना मिळाल्याचे दिसून आले.
तालुका व जिल्हास्तरीय नियुक्त्यांची तयारी
आगामी काळात पुणे शहर व जिल्ह्यात तालुकाध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठी संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रभर संघटन मजबूत करण्याचा संकल्प
महाराष्ट्र अल्पसंख्यांक विभागाचे आमदार प्रदेशाध्यक्ष साईद खान आणि प्रदेश कार्याध्यक्ष समीर गुलाम नबी काझी व महाराष्ट्र अल्पसंख्यांचे प्रदेश सचिव आजम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक समाजाला शिवसेनेशी जोडण्याचे आणि संघटन महाराष्ट्रभर मजबूत करण्याचे काम सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही हे अभियान अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



