औद्योगिक वसाहतप्रश्नी मंत्रालयात बैठक घेण्याची डॉ. पाटील यांची मागणी
शिरोळ : तालुक्यातील सैनिक टाकळी येथे प्रस्तावित MIDC ला विरोध करणाऱ्या माजी सैनिक व शेतकऱ्यांच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दिला असून, आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी MIDC बाबतची भूमिका स्पष्ट करावी, MIDC रद्द करावी आणि शेतकरी व माजी सैनिकांच्या भावना लक्षात घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे नेते डॉ. विकास पाटील यांनी केली.
जयसिंगपूर येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला भेट देऊन डॉ. विकास पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. सैनिक टाकळी हे माजी सैनिकांचे गाव असून, या गावातील माजी सैनिक आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून MIDC लादण्याचा प्रयत्न योग्य नाही. "MIDC साठी आमदारांचा हा बालहट्ट का? MIDC मधून आमदार नेमका कोणाचा विकास करणार?" असा सवाल डॉ. विकास पाटील यांनी उपस्थित केला.
माजी सैनिक व शेतकऱ्यांवर झालेल्या कथित भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉ. विकास पाटील यांनी केली. तसेच तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींवर कायद्यानुसार तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही डॉ. विकास पाटील यांनी केली.
सैनिक टाकळी MIDC च्या प्रश्नावर शासनाने आंदोलक, माजी सैनिक, शेतकरी आणि संबंधित लोकप्रतिनिधी, मंत्री यांची मंत्रालयात तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी डॉ. पाटील यांनी केली. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याऐवजी आंदोलनकर्त्यांवर दबाव आणणे किंवा त्यांच्यावर हल्ले होणे लोकशाहीला घातक असल्याचे डॉ. विकास पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी माजी सैनिकांच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा राहणार असल्याचे डॉ. विकास पाटील यांनी स्पष्ट केले. सैनिकांच्या गावातील गायरान जमीन, शेतकऱ्यांचे हित आणि परिसराचे भवितव्य यांचा विचार करूनच शासनाने MIDC संदर्भात निर्णय घ्यावा, अशी भूमिका डॉ. विकास पाटील यांनी मांडली.
"सैनिकांचा सन्मान, शेतकऱ्यांचा अधिकार आणि तिरंग्याचा गौरव अबाधित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. सैनिक टाकळी MIDC बाबत जनतेच्या भावनांचा आदर झाला पाहिजे," असे डॉ. विकास पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी आंदोलन अंकुशचे दिपक पाटील, रिटायर्ड वॉरंट ऑफिसर अमर पाटील, ऑ. कॅप्टन प्रकाश खोत, विजय गायकवाड, सकल मराठा समाजाचे चंद्रकांत जाधव, अमर पाटील, संभाजी ब्रिगेडचे विक्रम खराडे, विद्यानंद पाटील, अशोक पाटील, विजय पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह शेकडो ब्रिगेडचे कार्यकर्ते, माजी सैनिक आणि शेतकरी उपस्थित होते.
