रशिया आणि यूरोपातल्या कम्युनिस्ट देशांनी ज्यांना डोक्यावर घेतले, मार्क्सवाद , फुलेवादाने ज्यांना पछाडले होते, इंग्रजांनी ज्यांचा धसका घेऊन त्यांना पकडण्याकरिता जंग-जंग पछाडले होते, असे क्रांतिपुत्र म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील. या नाना पाटलांचा सांगली जिल्ह्यात जन्म, 03 ऑगस्ट 1900 मध्ये झाला.
नाना पाटील लहान असतानाच 1914 ला महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी खेड येथे शेतकरी परिषद भरवली होती. त्या परिषदेतच नानांच्या हातात महात्मा फुले च्या विचारांची मशाल महर्षि शिंदेनी दिली. सन 1918 ला कोल्हापुरच्या शाहू खासबाग मैदानात कुस्ती खेळण्यासाठी गेलेल्या नानांच्या हातातील फूलेवादाच्या मशालीला अधिक तेजाळ बनविण्यासाठी वैचारिक इंधन छत्रपती राजर्षी शाहूजी महाराजांनी पुरविले. 1918 पासुनच्या नाना पाटलांच्या वैचारिक परिवर्तनाच्या कार्यात फुले-शाहूंच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो.
1928 नंतर नाना पाटील भारतीय स्वतंत्र्य लढ्याच्या चळवळीत उतरले. स्वातंत्र्य लढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गाने त्यांचे कार्य सुरु झाले. फुले-शाहू महाराजांच्या विचारांचा जसा प्रभाव होता, तसाच वारकरी संप्रदायाबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार आणि लढ्याचेही आकर्षण होते, म्हणूनच इंग्रजांविरुद्ध धारकरी म्हणून लढले.
संत तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या प्रभावातून त्यांची वैचारिक बैठक निर्माण होत होती.ब्रिटीशांच्या विरुद्ध लढत असतानाच त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची संकल्पना आकारास येत होती.
स्वराज्य निर्माण करण्याकरिता महाराजांनी सैन्याची गरज ओळखून तरुण मावळ्यांची फौज निर्माण करुन स्वराज्य उभारले. शिवरायांची हिच प्रेरणा घेऊन आपण सुद्धा ब्रिटिश शासनास समांतर शासन यंत्रणा ऊभी केली पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात घोळत होता.
"आपुला आपण | करू कारभार" हे सूत्र आता त्यांनी स्विकारले. आपल्या देशाचा आपणच कारभार करण्याकरिता स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून तिला संरक्षण देण्याकरिता आपली सेना असावी, म्हणून त्यांनी 'तूफान सेना' या नावाने सैन्य दलाची स्थापना केली.
या तूफान सेनेचे फील्ड मार्शल जी. डी. लाड होते. या सेनेची कुंडला येथे युद्धशाळा उभरण्यात आली. या युद्धशाळेतून प्रशिक्षित झालेल्या पाच हजार लोकांचे दोनशे दल स्वतंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांच्या नाकावर टिच्चून काम करत होते.
नंतर 'आपलाच देश-आपलाच कारभार' या संकल्पनेतून "प्रतिसरकार (म्हणजेच स्वराज्य) स्थापन केले. म्हणजे ज्या-ज्या गावात प्रतिसरकार स्थापन केले गेले, तिथे इंग्रजांचे कायदे आणि प्रशासन न मानत लोकहित गृहीत धरणारे कायदे व प्रसाशन सूरु झाले. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालयाची स्थापना, दरोडेखोराना-पिळवणूक करणाऱ्या सावकारांना, पाटलांना, कुलकर्ण्यांना जबर शिक्षा, बाजार व्यवस्था, कष्टकरी-श्रमकरी वर्गाला अन्नधान्य पुरवणे अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. सामान्य लोकांवर अन्याय करणाऱ्या ब्रिटीशांच्या पायाला पत्रे ठोकण्यात येत होते; म्हणून नाना पाटलांच्या प्रतिसरकारला 'पत्रिसरकार' असेही म्हणत असत.
1943 ते 1946 दरम्यान सातारा आणि सांगली जिल्ह्यात सुमारे 1500 गावात प्रतिसरकार ची स्थापना करण्यात आली होती. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातील अन्य भागातही करण्यात आला होता.
ज्याप्रमाणे मोगलांना छत्रपती शिवाजी महाराज कधी येतील आणि हल्ला करतील अशी भिती होती; तसेच नाना पाटील ब्रिटीशांच्या रेल्वे, पोस्ट आदि सेवावर हल्ला करुन ब्रिटीशांचे नामोहरण करत असत, म्हणून लोक त्यांना क्रान्तिसिंह म्हणू लागले.
इंग्रजांनी त्यांना पकडण्याकरिता अनेक मोठ्या रक्कमांचे पुरस्कार जाहीर केले होते,परंतु नाना पाटील वेशांतर करण्यात इतके तरबेज होते की, इंग्रजांसमोर उभे राहूनही नाना पाटलांना इंग्रज ओळखू शकत नव्हते, जणू आधुनिक काळातील नाना पाटील म्हणजे बहिर्जी नाईकच.
या आधुनिक बहिर्जीचा वेषांतराबाबतीतला एक प्रसंग आहे. इंग्रजांची त्यांना पकडण्यासाठी धरपकड सुरु होती. इंग्रज पोलिसांना बातमी कळाली की, आज नाना पाटील दाढी करण्याकरिता गावात येणार आहेत, म्हणून पोलीस गावात दाखल झाले. त्यावेळी नाना पाटील गावातील नाव्ह्याकडे दाढी बनवीत असताना त्यांना आरशात पाठीमागून येणारे पोलीस दिसले तसेच नानांनी स्वतःच्या तोंडाला लावलेला साबण पुसला आणि नाव्ह्याच्या तोंडाला साबण लावला. स्वतः वस्तरा हातात घेऊन नाव्ह्याच्या गळ्याजवळ पकडला आणि तंबी दिली की, "गुमान बस, नाहीतर वस्तऱ्यांने गळाच कापतो". पोलीसांनी नानांना बघितले नव्हतं आणि तोंडाला साबण लावलेल्या नाव्ह्याला नाना पाटील समजून बेड्या ठोकल्या आणि त्याला काही बोलण्याची संधी न देता पोलीस स्टेशनला नेले.
तिथं त्या नाव्ह्याची नाना पाटील म्हणून चौकशी सुरु केली, तेव्हा त्या नाव्ह्याने सांगितलं की, "मी नाना पाटील नाही आहे, जो माझी दाढी बनवीत होता, तो नाना पाटील आहे." पोलीसांसोबत नानाने असा गनिमी कावा केला.
नाना पाटलांची मात्र लेखकांनी, इतिहासकारांनी कायमच उपेक्षा केली. भारतातील इतिहास लेखनसुद्धा जातीवादापासून सुटू शकलेलं नाही. थांबलेल्या जहाजावरून 8-10 फुटाच्या उडीला जेवढे महत्व इतिहासकारांनी दिले, तेवढे महत्व नाना पाटलांनी धावत्या रेल्वेतून ज्या नदीचे दोन्ही काठ पाण्याने भरलेले आणि हाता-पायात बेड्या पडल्या असताना कृष्णा नदीच्या पुलावर जेव्हा रेल्वे आली, तेव्हा जवळपास 80-90 फुटांवरून उडी मारली आणि सहीसलामत सुटून इंग्रजांच्या हातून पसार झाले, परंतु ही नाना पाटलांची उडी आम्हापर्यंत इथल्या जातीच्या चष्म्यातून पाहणाऱ्या इतिहासकारांनी येऊच दिली नाही.
15 ऑगस्ट, 1947 ला स्वातंत्र्यप्राप्तिनंतर जनतेला जसे स्वातंत्र्य हवे होते, तसे स्वातंत्र्य मिळाले नाही, म्हणून त्याच दिवशी, "मिळालेले स्वतंत्र्य अपूर्ण आहे, हे फक्त राजकीय स्वातंत्र्य आहे. झेंडा बदलला, खुर्चीतला साहेब बदलला मात्र कष्टकरी, कामगार, मजूर, शेतकरी, दलित, आदिवासी, भटके यांच्या जीवनातील शोषण संपले नाही. आता फक्त कष्टकऱ्यांना साथ". अशी भूमिका घेऊन क्रान्तिसिंहांनी काँग्रेस सोडून पुढे कम्युनिस्ट पार्टी आणि पुढच्या काळात फुले-शाहू यांच्या विचाराने चालणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या झेंड्याखाली काम करु लागले. त्यावेळचे नाना पाटलांचे वय 70 वर्षानंतर ही इथल्या शासन व्यवस्थेला लागू पडतय.
स्वातंत्र्यानंतर शांत बसतील ते क्रान्तिसिंह कसले, पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्तिची चळवळ, भूमिहीन शेतकऱ्यांची चळवळ अशा सर्वहार वर्गाच्या चळवळीत काम करत राहिले.
पुढे 1957 मध्ये सातारा आणि 1967 ला बीड लोकसभा क्षेत्रातून असे दोनदा संसदेत विक्रमी मतानी लोकांनी निवडून दिले. संसदेत आपल्या रांगड्या मराठी भाषेत भाषण करणारा पहिला सांसद होय. लोकनेते, लोकवक्ते आणि एक शस्त्र सेनापती म्हणून वावरलेल्या या क्रान्तिसिंहाचा मृत्यू 06 डिसेंबर, 1976 रोजी झाला. आज त्यांची जयंती. त्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
अनिल भुसारी, तुमसर, जिल्हा भंडारा.
