'ईद-ए-मिलादुन्नबी' सामाजिक सलोख्याचा संदेश आणि उत्साहाच्या भरतीत साजरी

shivrajya patra

‘नबी की आमद मरहबा’ ने दुमदुमले सोलापूर; ईद-ए-मिलादची भव्य मिरवणूक

सोलापूर : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलादुन्नबी सोलापूर शहरात पारंपरिक उत्साह, भक्तिमय वातावरण आणि सामाजिक सलोख्याच्या संदेशात साजरी करण्यात आली. विजापूर वेस येथून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत एका जुलुसमध्ये कमिठीच्या वेगवेगळ्या चुलींना फाटा देत हजारो मुस्लिम बांधवांसह लहान मुले, तरुण आणि आबाल-वृद्धांच्या उत्साहाच्या भरतीत साजरी झाली.

विजापूर वेस येथे सकाळी, 09 वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झेंडा फडकावून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. मिरवणूक मार्गावर विविध मंडळांकडून आकर्षक सजावट, स्वागत कमानी आणि धार्मिक देखावे उभारण्यात आले होते. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जीवन व शिकवणीवर आधारित ‘नात-ए-पाक’ सादर करत विविध मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती.

मागील  05 दिवसांपासून शहरातील विविध भागांत धार्मिक कार्यक्रम, प्रवचने आणि नात-ए-पाक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ‘आका का मिलाद आया’, ‘नबी की आमद मरहबा’ अशा घोषणांनी मिरवणूक मार्ग उत्साहाने दुमदुमून गेला.

ठिक -ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत

मिरवणुकीचे शहरातील विविध भागांत नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सहभागी बांधवांसाठी पाणी, शरबत आणि खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. अनेक ठिकाणी दिवसभर खिचडा, तहारी आणि मिठाई वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे मिरवणुकीच्या माध्यमातून सामाजिक बंधुभाव आणि एकोप्याचे दर्शन घडले.

विद्युत रोषणाईने उजळली विजापूर वेस

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासूनच शहरातील विविध मशिदी व धार्मिक स्थळांवर धार्मिक कार्यक्रम सुरू होते. यंदा प्रथमच विजापूर वेस परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहरातील अनेक मशिदींवरही विद्युत रोषणाई करण्यात आल्याने परिसराचे वातावरण भक्तिमय झाले होते.

असा होता मिरवणुकीचा मार्ग

विजापूर वेस येथून सुरू झालेली मिरवणूक बेगम पेठ, किडवाई चौक, जेलरोड परिसर, भारतीय चौक, बारा इमाम चौक, समाचार चौक, बसवेश्वर चौक, मधला मारुती, माणिक चौक आणि दत्त चौक मार्गे पुन्हा विजापूर वेस येथे दुपारी  01 वाजता पोहोचली. तेथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

... यांचा होता सहभाग

मिरवणुकीत शहर काजी मुफ्ती अमजदअली सय्यद, उत्सव अध्यक्ष समीर शेख व कम्मो शेख, आरिफ शेख, राज्य अल्पसंख्याक सदस्य वसीम बुऱ्हाण, राजू कुरेशी, यु. एन. बेरिया, मकबूल मोहोळकर, मतीन बागवान, शकील मौलवी, एम. डी. शेख आणि पिरअहमद शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक सलोखा, बंधुभाव, धार्मिक एकोपा आणि राष्ट्रीय सद्भावनेचा संदेश देत ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव सोलापुरात शांततेत आणि उत्साहात संपन्न झाला.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शिवभार : इम्रान सगरी, सोलापूर.

To Top