सोलापूर : पत्रकारिता ही लोकशाहीचा आरसा असून पत्रकारांनी निर्भीडपणे, प्रामाणिकपणे आणि वस्तुनिष्ठपणे समाजातील प्रश्न मांडले पाहिजेत. प्रशासनातील त्रुटी असोत अथवा नागरिकांच्या समस्या, त्या कोणताही मुलाहिजा न ठेवता लोकांसमोर आणण्याचे काम पत्रकारांनी करणे गरजेचे आहे. प्रामाणिकपणे काम केले, तर जीवनात यश नक्की मिळते. ‘मीडिया मास्टर’ नव्या पत्रकारांना दिशा देईल, असं प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले.
पत्रकार किरण बनसोडे लिखित जागृती पब्लिकेशन प्रकाशित ‘मीडिया मास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन महापौर कोंड्याल यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्रा. डॉ. शिवाजीराव शिंदे, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माने, ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड, बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, दैनिक 'तरुण भारत' चे समूह मुख्य संपादक दिलीप पेठे, मुख्य संपादक प्रशांत माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश कोरे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, पत्रकार विजय गायकवाड, प्रकाशक सोमनाथ गायकवाड, लीना बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मध्यम साक्षरता चळवळीत योगदान देणारे प्रा. डॉ. अंबादास भास्के आणि विजय लोंढे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कोंड्याल पुढे म्हणाले, किरण बनसोडे यांनी पत्रकारितेतील 24 वर्षांचा अनुभव ‘मीडिया मास्टर’ च्या माध्यमातून नव्या पिढीसमोर मांडला आहे. यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया माध्यमातून अनेकजण पत्रकारितेत येत आहेत. मात्र समाजात नेमके काय घडत आहे, याची वस्तुनिष्ठ माहिती लोकांसमोर मांडणारे आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे पत्रकार घडणे आवश्यक आहे. या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचे आहे. नव्या पिढीतील पत्रकारांसाठी आदर्श निर्माण करणारे हे पुस्तक असल्याचेही महापौर कोंड्याल यांनी सांगितले.
सहकाऱ्यांचं मार्गदर्शन आणि कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आज हा 'सोन्याचा दिवस' पाहायला मिळाल्याचे भावूक मनोगत लेखक किरण बनसोडे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पत्रकार विजय गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी तडवळकर यांनी केले.
यावेळी भालचंद्र साखरे, श्रावण भंडारे, डॉ. हिराकांत जाधव, समाधान जाधव यांच्यासह पत्रकारिता, शिक्षण, प्रशासन, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निष्ठावंत पत्रकारितेचा वारसा : दत्ता गायकवाड
सोलापूरच्या वृत्तपत्र परंपरेला 'सोलापूर समाचार' पासून मोठा आणि निष्ठावंत इतिहास लाभला आहे. रंगाअण्णा वैद्य आणि व्ही. आर. कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गजांनी या भूमीत पत्रकारिता आणि साहित्य समृद्ध केले. किरण बनसोडे यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करत, विचारांशी प्रामाणिक राहून आणि सामाजिक बांधिलकी जपत ही परंपरा पुढे नेली आहे. हे पुस्तक सोलापूरच्या वैचारिक वारशात भर घालणारे ठरेल, असा विश्वास विचारवंत दत्ता गायकवाड यांनी व्यक्त केला.
---
'मीडिया मास्टर' 21 विद्यापीठांसाठी अभ्यासू ग्रंथ : डॉ. शिवाजीराव शिंदे
विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी 'मीडिया मास्टर' पुस्तकाच्या रचनेचे कौतुक केले. 146 पानांच्या या ग्रंथात 46 महत्त्वाच्या मुद्द्यांचा आणि 100 टिप्सचा सूक्ष्म अभ्यास सोप्या भाषेत मांडला आहे. हे पुस्तक केवळ पत्रकारांसाठीच नव्हे, तर लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसाठीही मार्गदर्शक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 21 विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
---
पत्रकार व प्रशासन एकमेकांना पूरक : मल्हारी माने
पत्रकार आणि प्रशासन हे एकमेकांचे विरोधी नसून समाजहितासाठी काम करणारे पूरक घटक आहेत, असं मत मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मल्हारी माळी यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी व्यवस्थेतील चांगल्या गोष्टींचे उदात्तीकरण करण्यासोबतच त्रुटींवर बोट ठेवून प्रशासनाला वेळीच सुधारण्याची संधी दिली पाहिजे. किरण बनसोडे यांच्या 'मीडिया मास्टर' ग्रंथाला त्यांनी प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
---
सामाजिक बांधिलकीचे कौतुक : अण्णासाहेब भालशंकर
नागरी समस्या सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बनसोडे यांनी सातत्याने लेखणी चालवली आहे. हे पुस्तक नव्या पिढीला बातमीदारीचे आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे धडे देणारे एक उत्तम माध्यम ठरेल, असे मत बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी व्यक्त केले.
---
बातमीतील विश्वासार्हता टिकवण्याचे आव्हान : प्रशांत माने
आजच्या डिजिटल युगात पत्रकारितेसमोरील विश्वासार्हतेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या माहितीची योग्य खातरजमा केल्याशिवाय पत्रकारांनी बातमी पुढे नेऊ नये, असे मत तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने यांनी व्यक्त केले.
किरण बनसोडे लिखित 'मीडिया मास्टर' हे पुस्तक सर्वांनी वाचल्यास समाजातील प्रत्येक घटक प्रत्यक्ष पत्रकार झाला नाही, तरी पत्रकाराच्या भूमिकेत प्रभावी काम करू शकतो. बनसोडे यांच्या बातम्यांवर संपादक म्हणून संस्कार करावे लागत नाहीत, हेच त्यांच्या पत्रकारितेचे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
***
