शांतीदूत हजरत मोहम्मद पैगंबर (सल्लल्लाहू अलैहि व सल्लम)

shivrajya patra

 
            शांतीदूत 

हजरत मोहम्मद पैगंबर

    (सल्लल्लाहू अलैहि व सल्लम)

जगभरात मुस्लिम बांधव आज इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद साहेब यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलादुन्नबी म्हणून साजरा करीत आहेत.

हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म 20 एप्रिल, 571 इसवी मध्ये मक्का येथे झाला. त्यांचे वडील हजरत अब्दुल्ला यांचे पैगंबरांच्या जन्मापूर्वीच निधन झाले होते. आई हजरत आमेना यांनी त्यांचे पालनपोषण केले. आजोबा हजरत अब्दुल मुत्तलीब यांच्या सानिध्यात ते वाढले.

वयाच्या सहाव्या वर्षी आईने पण जगाचा निरोप घेतला. त्यानंतर बालपणी पैगंबरांचे पालनपोषण आजोबा व चुलते यांनी केले. लहानपणीसुद्धा हजरत पैगंबर अत्यंत लाजाळू व पापभिरू वृत्तीचे होते. त्यांनी चुलत्याबरोबर व्यापार निमित्ताने अनेक ठिकाणी प्रवास केला. पुढे वयाच्या चाळिसाव्या वर्षी त्यांना प्रेषित्व प्राप्त झाले.
शहराच्या जवळ असलेल्या गार-ए-हिरामध्ये जाऊन ते अल्लाहचे नामस्मरण व प्रार्थना करीत. तरुणपणी सुद्धा हजरत पैगंबर यांना सर्व लोक सादिक म्हणजे सच्चा व अमीन  म्हणजे अमानतदार म्हणून ओळखत होते.

प्रेषित्व मिळाल्यानंतर अल्लाहाच्या आदेशाने त्यांनी लोकांना इस्लाम धर्माची शिकवण सांगावयास प्रारंभ केला. पण त्यांचे हे कार्य पाहून मक्का मधील प्रस्थापित लोक त्यांच्या विरोधात गेले आणि आमच्या पूर्वजांच्या धर्माला नाव ठेवतो, म्हणून त्यांचा विरोध सुरू केला. पण त्यांना काही सच्चे साथीदार मिळाले ज्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता.

आपल्या या जिवलग सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी इस्लामचा प्रचार व प्रसार सुरू केला. पुढे खूपच विरोध झाल्याने त्यांनी अल्लाहाच्या आदेशाने मक्काहून मदिना येथे हिजरत केली व मदिना मध्ये धर्माचे कार्य जारी ठेवले.

हजरत पैगंबरांनी आपल्या वर्तनाने जगासमोर मोठा आदर्श निर्माण केला. जीवन जगण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या, हे त्यांनी स्पष्ट केले. सचोटी, दया, करुणा, इमानदारी या तत्त्वांचा पुरस्कार केला. महिलांना आदराचे स्थान दिले. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन दिले. वेळप्रसंगी धर्मयुद्ध सुद्धा त्यांना करावे लागले, परंतु हे करताना त्यांनी नियमांचे पालन केले.

जगाला शांती व समतेचा संदेश दिला. सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे, कुणीही लहान अथवा मोठा नाही. आपण सर्व एकाच आदमची लेकरे आहोत, हे त्यांनी जगाला सांगितले. जीवन जगताना चांगल्या प्रकारे कसे जगावे याचे उत्तम उदाहरण त्यांनी स्वतःच्या आचरणाने घालून दिले.

त्यांनी कुणाशीही वैरभाव कधी बाळगला नाही. शत्रूला सुद्धा सन्मानाची वागणूक दिली. एक आदर्श जीवन प्रणाली कशी असावी, याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी जगासमोर घालून दिले.

जगातील सर्व माणसे एक आहेत. गोरा किंवा काळा, श्रीमंत किंवा गरीब, मोठा किंवा लहान अशा भावनांना त्यांनी कधी थारा दिला नाही. आपण या दुनियेत केलेल्या प्रत्येक बाबीचा हिशोब आपल्याला द्यावा लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने सद्वर्तन करावे, अशी शिकवण त्यांनी दिली.

हजरत पैगंबरांनी आपल्या जीवनात फक्त एकदाच हज यात्रा केली. सर्वांशी प्रेमाने वागण्याची शिकवण त्यांनी दिली. पैगंबर जयंती जगभरात मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. या निमित्ताने हजरत पैगंबरांच्या आदर्श जीवनाच्या बाबी जगासमोर उलगडून सांगितल्या जातात व त्यांनी दिलेला शांतता, समता, बंधुता व प्रेमाचा संदेश जगभरात पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांचे अनुयायी करतात.

हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांनी जो आदर्श आपल्या जीवनामध्ये निर्माण केला. त्याचा स्वीकार करून संपूर्ण मानवजातीचे कल्याण होऊ शकते, अशी शिकवण पैगंबर जयंतीच्या निमित्ताने दिली जाते.
सर्वांना पैगंबर जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा... !

सलीमखान पठाण,
    8999075925

To Top