रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

shivrajya patra

सोलापूर : रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. रक्षाबंधनाच्या दिवशीच श्री मार्कंडेय रथोत्सवाची मिरवणूक निघण्याची परंपरा आहे. यंदाही पारंपरिक उत्साहात रथोत्सवाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीचे उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह महिलांच्या लेझीम पथकाने सादर केलेल्या आकर्षक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

दरम्यान, विजापूर वेस चौकात महिलांचे लेझीम पथक पाहत असताना एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. सानवी योगेश पगडीमल या चिमुकलीने आमदार देवेंद्र कोठे यांना राखी बांधली. अनपेक्षितपणे मिळालेली ही राखी आमदार कोठे यांनी मोठ्या आपुलकीने स्वीकारली.

चिमुकल्या बहिणीच्या प्रेमाने भारावून गेलेल्या आमदार कोठे यांनी तिचे आशीर्वाद घेत तिच्या भावनेचा सन्मान केला. रथोत्सवाच्या जल्लोषात घडलेल्या या बहीण-भावाच्या प्रेमळ भेटीने उपस्थितांचंही लक्ष वेधून घेतले.

रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी जपलेला हा स्नेहबंध उपस्थितांसाठी भावनिक आणि आनंददायी क्षण ठरला.

*****

शब्दांकन : दीपक सोमा, सोलापूर.

To Top