डॉल्बी,ढोल-ताशांचा दणदणाट, पौराणिक, धार्मिक,,सांस्कृतिक देखावे, लेझीमचा ताल, विविध धार्मिक व सांस्कृतिक देखावे, ढोल, लेझीमचा बहारदार खेळ, शक्ती प्रयोगाचे थरारक खेळ पाहण्यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री दहापर्यंत सुमारास दत्तनगर, पद्मशाली चौक, पोलिस हेडक्वार्टर रोड परिसरात अलोट गर्दी झाली होती.
भक्ती, शक्ती, सळसळता अमाप उत्साह यावेळी ओसंडून वाहत होता. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिलांनी लेझीमचा तसेच सूर्योदय मंडळाने ढोलचा बहारदार खेळ सादर केला. ढोल-ताशे, लेझीम, चित्त थरारक कसरती, हलते देखावे आणि श्री मार्कंडेय महामुनींच्या जयघोषाने सारा पूर्व भाग परिसर अक्षरशः दुमदुमून गेल्याचे चित्र दिसून आले.
‘श्री ओम साई प्रतिष्ठान’ च्यावतीने साकारण्यात आलेला राजस्थानमधील प्रसिद्ध श्री खाटूश्याम मंदिराचा भव्य देखावा मिरवणुकीचे आणखी एक आकर्षण ठरले. ‘हारे का सहारा’ म्हणून ओळखल्या जाणार्या खाटूश्यामजींच्या मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. 
या मिरवणुकीत घोंगडे वस्ती प्रतिष्ठान, जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ, जे. पी. कंपनी, जे. एम. संघटना, आर्या टू डान्स ग्रुप, कर्ण साम्राज्य, एमटीएम बॉईज, बजरंग सेना, माधवनगर लेझीम संघ, जय मार्कंडेय सामाजिक संस्था मित्र मंडळ, जय मार्कंडेय बहुउद्देशीय संस्था, न्यू सुनीलनगर मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ आदी मंडळांचा मिरवणुकीत सहभाग होता.
मंदिरापासून रथ मिरवणुकीचा प्रारंभ झाल्यावर विजापूर वेस, भारतीय चौक भवानी मंदिर, रत्न मारुती मंदिर रोड, जगदंबा चौक, पद्मशाली चौक, आंध्र दत्त चौक, मार्कंडेय सोलापूर रुग्णालय, भद्रावती पेठ, जोडबसवण्णा चौक, मार्कंडेय चौक, राजेंद्र चौक, भुलाभाई चौक, नेताजीनगर, जोडभावी पेठ, कन्ना चौक, औद्योगिक बँक, साखर पेठ, सोमवार पेठ, समाचार चौक, माणिक चौक, विजापूर वेसमार्गे रात्री उशिरा मार्कंडेय मंदिराजवळ मिरवणुकीचा समारोप झाला.
... चौकट
प्रथमच महिलांचे लेझीम पथक
यंदाच्या रथोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते महिला लेझीम पथकाचे. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच महिलांच्या लेझीम पथकाने रथोत्सवात सादरीकरण करून लेझीमचा बहारदार डाव सादर करून लक्ष वेधून घेतले. 
पारंपरिक वेशभूषेतील महिलांनी लेझीमच्या तालावर केलेल्या विविध खेळांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. याशिवाय मिरवणुकीत अनेक कसरतींचे खेळ सादर करण्यात आले. याशिवाय काही तरुणींनी सूर्योदय मंडळाच्या ढोल पथकामध्ये सहभाग नोंदवला.
...हे विणत होते भगवान मार्कंडेयांसाठी महावस्त्र !
रथोत्सव मिरवणुकीत एका वाहनावर उमा कारमपुरी व बालमणी पूलूर या चरख्यावर सूत कातत होत्या तर अंबादास करली व लक्ष्मण गणपा यांनी सूतापासून हातमागावर भगवान मार्कंडेयांसाठी महावस्त्र विणत होते. रथोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक श्रद्धा, पारंपरिक संस्कृती आणि सामाजिक एकतेचा याचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
शब्दांकन : वेणुगोपाल घाडी, सोलापूर.
