'नुलुपुन्नमी'निमित्त पूर्व भागात घुमला 'जय मार्कंडेय'चा नारा ! सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडेय मंदिरात धार्मिक विविध कार्यक्रम

shivrajya patra

सोलापूर : पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव शुक्रवारी मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरा साजरा झाला. यानिमित्त सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडेय मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी होती.

रथोत्सवानिमित्त मार्कंडेय मंदिरात पहाटे चारपासून धार्मिक विविध विधींना सुरुवात झाली. याअंतर्गत महर्षी मार्कंडेय मूर्तीस रुद्राभिषेक पूजा मानकरी इंदापुरे व संगा परिवार तसेच प्रमोद कोंडा, प्रवीण कोंडा दांपत्याच्या हस्ते करण्यात आली. 

तद्नंतर चंडीयाग व नवग्रह पूजा शीतल शरद बोरला व सौजन्या अनिल अवधूत दांपत्याच्या हस्ते पार पडली. दरम्यान मार्कंडेय  मंदिरावर पद्मध्वजारोहण पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते करण्यात आले. 

मार्कंडेय मंदिराचे अर्चक राघवेंद्र आरकाल तसेच पद्मशाली पुरोहित संघाच्या सहकार्याने मंदिरातील धार्मिक विधी पार पडले. पद्मशाली बांधव नुलुपुन्नमी रोजी मार्कंडेय रथोत्सव साजरा करतात. कोकणी लोक जसे नारळी पौर्णिमा साजरी करतात, त्या धर्तीवर पद्मशाली बांधव नुलुपुन्नमी साजरी करतात. 

नुलू म्हणजे सूत आणि पुन्नमी म्हणजे पौर्णिमा ! पद्मशाली हे विणकर असल्याने या पौर्णिमे रोजी सुताची पूजा करतात. कापसाच्या राख्या तसेच जानवे परिधान करतात. शुक्रवारी रथोत्सव दिनी मार्कंडेय मंदिरात पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत पद्मशाली बांधवांची दर्शनासाठी मोठी रीघ होती. दर्शनाच्या वेळी समाज बांधवांकडून 'जय मार्कंडेय...' चा निरंतर जयघोष सुरू होता. 

दर्शन घेतल्यावर भक्तगणांनी मंदिरातील पहिल्या मजल्यावर पुरोहितांकडून जानवे धारण करतानाच  कापसाच्या राख्याही बांधून घेतल्या. दुपारी मंदिरापासून रथाची पूजा सुदर्शन गुंडला यांच्या हस्ते तर मिरवणुकीचा प्रारंभ पोलीस आयुक्त एम. राजकुमार, आ. देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे, सत्यनारायण गुर्रम, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, रमेश कैरमकोंडा, विश्वस्त मुरलीधर आरकाल, रामचंद्र जन्नू, अंबादास बिंगी, राजमहेंद्र कमटम, पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष ॲड. हेमंतकुमार साका, माजी महापौर श्रीकांचना यन्नम,  अशोक इंदापुरे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रीतम यावलकर, विजयालक्ष्मी कुर्री आदी उपस्थित होते.

---

...चौकट

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे रथयात्रेवर पुष्पवृष्टी

रथाचे विजापूर वेस येथे आगमन झाल्यावर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे सालाबादप्रमाणे पुष्पवृष्टी करण्यात आली. पद्मशाली समाजातील मान्यवरांच्या सत्कार करून रथाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या निमित्ताने मुस्लिम ब्रिगेडतर्फे धार्मिक सलोखा व एकतेचा संदेश देण्यात आला.

याप्रसंगी  ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म. शफीक रचभरे, माजी महापौर आरीफ शेख, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांच्यासह अन्य पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. 

***

शब्दांकन : वेणुगोपाल घाडी, सोलापूर.

To Top