जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी
उजनी जल पर्यटन प्रकल्पामुळे निर्माण होतील रोजगाराच्या संधी
मतदार याद्यांचे पुनरीक्षण १०० टक्के पूर्ण झाले असून नागरिकांनी १७ ऑगस्टपर्यंत करावी दुरुस्ती
भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ निमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुक्त शासकीय ध्वजारोहण
पालकमंत्री यांच्याकडून सर्व तंबाखू मुक्तीची तसेच जलसंधारण दिनाची देण्यात आली शपथ
सोलापूर/15 : राज्य शासनाने माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवण्यासाठी त्यांचा जन्मदिवस 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी दरम्यान जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. "माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा" या संकल्पनेतून जलसमृद्ध, दुष्काळमुक्त आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर महापालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी राहुल क्षीरसागर यांच्या सह स्वातंत्र्य सैनिक, वीर माता, वीर पत्नी, ज्येष्ठ नागरिक, मान्यवर नागरिक, पदाधिकारी, अधिकारी- कर्मचारी पालक, विद्यार्थी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 26 हजारांहून अधिक शेतकऱ्यांची यादी तयार झाली असून आधार सीडिंग करून लाभ थेट खात्यात जमा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आषाढी वारीत 32 लाख भाविकांना सुविधा पुरवण्यात आल्या. पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी 4 हजार कोटींचा विकास आराखडा मंजूर झाला असून स्थानिकांना रोजगार व सुविधा मिळणार आहेत.सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याने व्यापारी, रुग्ण व प्रवाशांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरातील उड्डाणपुलासाठी जागा हस्तांतरण 93 टक्के पूर्ण झाले असून लवकरच काम सुरू होणार आहे.1478 कोटींच्या जलपुरवठा प्रकल्पामुळे 2060 पर्यंत प्रत्येक घरात शुद्ध पाणी मिळणार आहे. BT-२ सत्ताप्रकार प्रश्न सुटल्याने हजारो कुटुंबांना मालकी हक्क मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास, रमाई, शबरी, मोदी व अहिल्यादेवी होळकर योजनांतर्गत 1.83 लाख घरकुलांपैकी 85 हजार पूर्ण झाली आहेत, असे गोरे यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांतर्गत विद्यार्थ्यांना व गरजू कुटुंबांना थेट मदत मिळाली आहे.जिल्ह्यातील 14 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे. उजनी जल पर्यटन प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. पत्रकारांसाठी 214 सदनिका राखीव ठेवण्यात आल्या आहेत.मतदार याद्यांचे पुनरीक्षण 100 टक्के पूर्ण झाले असून नागरिकांनी 17 ऑगस्टपर्यंत दुरुस्ती करावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. गोरे यांनी केले.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 3.० मध्ये सोलापूरची निवड झाली आहे. अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी 150 कोटी निधी मंजूर झाला आहे. भटके विमुक्त समूह दाखला मेळावे सुरू झाल्याने वंचित घटकांना न्याय मिळणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेसाठी 991 कोटी निधी मंजूर झाला आहे. शेवटी सर्वांनी जिल्ह्याच्या विकासासाठी, सामाजिक समतेसाठी आणि राष्ट्रहितासाठी एकत्रित येऊन कार्य करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाचे स्मरण करून सोलापूरच्या ऐतिहासिक "स्वतंत्र सोलापूर" परंपरेचा गौरव केला. हर घर तिरंगा मोहिमेमुळे राष्ट्रीय भावना जागृत होत आहे, असे त्यांनी म्हटले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन निमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी 9.05 वाजता करण्यात आले. तत्पूर्वी वंदे मातरम, ध्वजारोहण प्रसंगी राष्ट्रगीत व त्यानंतर महाराष्ट्र गीत गायन झाले. त्यानंतर तंबाखू मुक्तीची तसेच जलसंधारण दिनाची शपथ देण्यात आली. यावेळी पालकमंत्री गोरे यांनी या समारंभास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, नागरिक व विद्यार्थी यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जलसंधारण सप्ताह शुभारंभ
जलसंधारण विभागाच्या वतीने दिनांक 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या कालावधीत जलसंधारण सप्ताह राबवण्यात येत आहे. तसेच 15 ऑगस्ट 26 जानेवारी या कालावधीत जलसंधारण अभियान राबवले जाणार आहे. या अनुषंगाने पाणी व माती संवर्धनासाठी महा वॉकेथॉन, रिल्स स्पर्धा घेण्यात येणार आहे, त्याच्या लोगोचे अनावरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा विभागातील अधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले तर राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
********
