बालाजी पवार दुसऱ्यांदा M.P.D.A. कायद्यान्वये स्थानबध्द

shivrajya patra

सोलापूर :  जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण हद्दीतील शरिराविषक, वाळू तस्करी आणि अवैध धंदे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावार प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करावे, त्याचबरोबर प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यात करकंब येथील सराईत गुन्हेगार बालाजी हनुमंत पवार, (रा. खेडभोसे, ता. पंढरपूर) याच्याविरूध्द M.P.D.A. कायद्यान्वये दुसऱ्यांदा स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.

सराईत गुन्हेगार बालाजी पवार याच्याविरुद्ध वाळू चोरी, मालाविषयक, शरिराविषक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये जबरी चोरी करताना इच्छापुर्वक दुखापत करणे, मालमत्ता हिसकावून घेणे, घातक हत्याराने इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, नुकसान करण्याच्या उद्देशाने जाळपोळ, विनयभंग, अवैधरित्या विनापरवाना विना रॉयल्टी नदी पात्रातून वाळू उपसा करून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करणे असे 09 गुन्हे करकंब, अकलूज आणि नातेपुते पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

स्थानबध्द बालाजी पवार याच्या वाढत्या गुन्हेगारी वृत्तीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्फतीने सहा. पोलीस निरीक्षक (करकंब पोलीस ठाणे) यांनी जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे M.P.D.A. कायदयान्वये प्रस्ताव सादर केला होता.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी M.P.D.A. कायद्यान्वये स्थानबध्द करण्याबाबत आदेश निर्गमित केले होतो. तो सोलापूर येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. भिमगोंडा पाटील यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीता करकंब पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले होते. त्यांनी कारवाई करून बालाजी पवार यास पुणे येथे येरवडा कारागृहात स्थानबध्द केले आहे.

विशेष म्हणजे बालाजी पवार यास यापूर्वी M.P.D.A. कायद्यांतर्गत यापूर्वी स्थानबध्द करण्यात आले होते. त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाई करुन सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत आणि भिती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, (पंढरपूर) प्रशांत डगळे, अपर जिल्हादंडाधिकारी (सोलापूर) अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्थानिक गुन्हे शाखा), स.पो.नि. योगेश लंगुटे, प्रभारी अधिकारी (करकंब पोलीस ठाणे), सहा. पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील, सपोफौ निलकंठ जाधवर, पो. हे. कॉ. अनिस शेख, पो. हे. कॉ. मोहन मनसावाले, पो. कॉ. किरण चव्हाण (नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा), पो. स. ई. निलेश पोमणे, स.पो.फौ. विलास रणदिवे, पोहेकॉ असिफ अतार, पो.कॉ स्वप्निल बागल, पोहेकॉ भांगे, पोहेकॉ शिकतोडे, पोहेकॉ भोसले, पोना सावंत, पोकॉ भोसले, पोकॉ गायकवाड, पोकॉ काळे, पोकॉ महेश बोंगाणे (नेमणूक - करकंब पोलीस ठाणे) तसेच जिल्हादंडाधिकारी कार्यलयाकडील श्री. उत्कर्ष देवकुळे, नायब तहसिलदार विलास म्हेत्रे यांनी कामकाज केला आहे.

*** 

गुन्हेगारी अभिलेख तयार; लवकरच प्रभावी कारवाई !

सोलापूर ग्रामीण हद्दीतील वाळू तस्करी, शरिराविषक, मालाविषयक, आणि अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमांचे गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले आहेत. त्यांच्याविरूध्द M.P.D.A. कायद्यान्वये यापुढे देखील अशाच स्वरूपाची प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे.

अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर (ग्रामीण).


To Top