विनयभंगाचा गुन्हा सिद्ध; आरोपीस 03 वर्षे सक्तमजुरी आणि ₹ 10,000 दंड

shivrajya patra

सोलापूर : मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील भारतीय दंड संहिता कलम 354, 504, 506 व 509 अन्वये दाखल गुन्ह्यात मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती वृशाली (व्ही. के.) पाटील यांच्या मंगळवेढा न्यायालयाने आरोपी शंकर उर्फ दादा बसवेश्वर बुरजे यास दोषी ठरवून 03 वर्षे सक्तमजुरी आणि ₹ 10,000 द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना मान्य न्यायालयात केस चालवून जबर शिक्षा होण्याकरिता वेळोवेळी मार्गदर्शन कार्यशाळा आणि प्रशिक्षणाचे आयोजन केलेलं होतं.

या प्रकरणात 14 मार्च 2019 रोजी आरोपीने फिर्यादी महिलेचा विनयभंग करून तिचा शीलभंग होईल, असे कृत्य केले तसेच शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी व शीलाचा अपमान होईल, असे शब्द उच्चारल्याबाबत दुसऱ्या दिवशी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी यांनी करून आवश्यक पुरावे संकलित करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयीन कामकाजादरम्यान सहाय्यक सरकारी वकील स्वप्नील अभंग, पैरवी अधिकारी पोलीस हवालदार व्ही. एम. वाघमारे (ब.क्र. 1703) तसेच कोर्ट ऑर्डरली पोलीस कॉन्स्टेबल ए. बी. बाबर (ब.क्र. 1351) यांनी सरकारी पक्षाची प्रभावी बाजू मांडली. न्यायालयाने आरोपी शंकर उर्फ दादा बसवेश्वर बुरजे यास दोषी ठरवून 03 वर्षे सक्तमजुरी आणि ₹ 10,000 द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली.

न्यायालयाने एकूण ₹10,000 दंडापैकी ₹5,000 फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आणि उर्वरित ₹5,000 राज्य शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले असून सर्व शिक्षा एकत्रित (Concurrent) भोगण्याचे निर्देश दिले.

हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बिरिगिड्डे, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, तसेच सरकारी वकील, पैरवी अधिकारी व कोर्ट ऑर्डरली यांच्या प्रभावी समन्वयामुळे हा गुन्हा यशस्वीरित्या सिद्ध झाला.

... चौकट

न्यायालयाने सुनावलेली शिक्षा

भा.दं.वि. कलम 354 – 03 वर्षे सक्तमजुरी व ₹5,000 दंड.

भा.दं.वि. कलम 504 – 06 महिने साधी कैद व ₹1,000 दंड.

भा.दं.वि. कलम 506 – 06 महिने साधी कैद व ₹1,000 दंड.

भा.दं.वि. कलम 509 – 01 वर्ष साधी कैद व ₹3,000 दंड.

*****

To Top