श्री सरस्वती विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा साजरी
मुंबई (पी. डी. पाटील) : आई-वडील, शिक्षक यांच्यावर निष्ठा आणि विश्वास असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर शिक्षकांनी आताच्या डिजिटल युगात विद्यार्थी व शिक्षक यांच्यात दुरावा होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जयवंत पाटील यांनी केले.
भांडूप (प.) मधील श्री सरस्वती विद्यामंदिर, शाळेत बुधवारी, 29 जुलै रोजी गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जयवंत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. संस्थेच्या संचालिका वर्षा वसंत सावंत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होत्या. 
त्यांनी प्रा. पाटील यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता गोळे यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले, तसेच आपल्या मधुर स्वरात ' गुरूने दिला ज्ञानरूपी वसा ' गीताने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. 
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या गायन, भाषण, नृत्य, कवितांतून गुरूबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. स्वामी समर्थ केंद्राचे प्रकाश गोडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांना शाळेला देणगी देऊन सर्व शिक्षकांना गुलाब पुष्प दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वडनेरे मॅडम यांनी केले तर पर्यवेक्षक नरेंद भारंबे यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.
