शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि MH-CET गैरव्यवस्थेविरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस खासदारांचे आंदोलन

shivrajya patra

नवी दिल्ली : देशातील शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, गैरव्यवस्था आणि सातत्याने समोर येत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात काँग्रेस खासदारांनी शुक्रवारी, 31 जुलै नवी दिल्लीतील संसद भवनच्या मकरद्वारावर जोरदार निदर्शने केली. यावेळी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर प्रश्नांवर सरकारने उत्तर द्यावं, अशी मागणी केली.

भारतातील शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचार, गैरव्यवस्था आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे गंभीर संकटात सापडली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने या व्यवस्थेतील प्रश्न संपलेले नसून, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यापक, पारदर्शक आणि उत्तरदायी सुधारणा करणे आवश्यक आहे, अशी भूमिका काँग्रेस खासदारांनी मांडली.

महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांपासून MH-CET अभियांत्रिकी परीक्षेतील निकाल आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेतील गुणांमध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. MH-CET परीक्षेत अव्वल ठरणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नसल्याची बाब गंभीर असून, या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

पेपरफुटी रोखण्यासाठी केवळ जलदगती न्यायालयांचा कायदा करणे पुरेसे नाही. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित प्रश्नांवर ठोस, पारदर्शक आणि जबाबदार निर्णय घेणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे काँग्रेस खासदारांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदारांनी “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही!”, “शिक्षणात पारदर्शकता, न्याय आणि उत्तरदायित्व हवे!” अशा घोषणा देत MH-CET परीक्षेतील कथित गैरव्यवस्था आणि शिक्षण क्षेत्रातील अनियमिततेविरोधात आवाज उठविला.

**** 

To Top