सोलापूर : शहर गुन्हे शाखेच्या तपास पथकाने Mephedrone (MD) विक्रीसाठी निघालेल्या तरुणास पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना पकडले. त्याच्या ताब्यातून 06, 80, 000 रूपयांचं 34 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. रुपेश प्रदिप थडसरे असं आरोपीचं नाव असून त्यास न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
शहरामध्ये अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासंबंधी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने, बुधवारी, 29 जुलै रोजी गुन्हे शाखेकडील पोउपनि मनोज मोरे आणि त्यांच्या तपास पथक अवैध धंद्यावर तसेच अवैध अंमली पदार्थ विक्रीत गुंतलेल्या इसमांवर कारवाई करण्याकरीता शहर हद्दीत पेट्रालिंग करीत असताना, छत्रपती संभाजी महाराज पुतळाजवळ, जुना पुना नाका येथे ब्रीज जवळील सार्वजनिक रोडच्या बाजूस, सोलापूर येथे एक तरूण संशयित हालचाली करीत असताना दिसून आला. 
पोलिसांना पाहून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यामध्ये एका प्लास्टीक पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची Mephedrone (एम.डी.) सदृश्य पावडर मिळून आल्याने पोलीस आयुक्तालयकडील फॉरेन्सिक टिमला तात्काळ पाचारण करून त्या पावडरची रासायनिक तपासणी केली असता, ती पावडर Mephedrone (एम.डी.) अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून रुपेश प्रदिप थडसरे (वय- 34 वर्षे, रा. घर नं. 72, मित्र नगर, शेळगी.) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने Mephedrone (एम.डी.) अंमली पदार्थ सोलापूर शहरामध्ये विक्री करीता घेऊन आल्याचे सांगितले.
त्यानंतर रुपेश प्रदिप थडसरे याच्याविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम 08 (क), 22 (ब), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडील पोउपनि विजय बनसुडे करीत आहेत. आरोपीस गुरूवारी न्यायालयाचे समक्ष हजर केले असता, न्यायालयानं त्यास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
चौकट
.... यांनी पार पाडली ही कामगिरी !
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे ) दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने, स. पो. नि. दत्तात्रय काळे, पोउपनि मनोज मोरे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे, युवराज गायकवाड, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, रामेश्वर साखरे, धिरज सातपुते, अभिजीत पवार, शंकर याळगी, बाळू काळे आणि मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली.
