सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पराक्रमाचे आणि कर्तुत्वाचे चित्र उभा करत शाहिरांनी महाराष्ट्राची एैतिहासिक परंपरा पोवाड्याच्या माध्यमातून मांडली. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने तीन दिवसीय शाहिरी महोत्सवाचे आयोजन सोलापूरमध्ये हुतात्मा स्मृती मंदिरात करण्यात आले होते, त्याचा समारोप बुधवारी करण्यात आला.
प्रारंभी, 'गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्य गीताने सुरूवात करण्यात आली. त्यानंतर समन्वयक अमोल धाबळे यांनी प्रास्ताविक केले. तीन दिवसात राज्यातील विविध भागातील सुप्रसिध्द शिवशाहीरांनी या शाहिरी महोत्सवात येवून सहभाग घेतला आणि आपली कला सादर केली. 
महिला शाहीरांनीही आपली कला सादर करण्यात कुठेच कमतरता दाखवली नाही. सोलापूरसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असेही धाबळे यांनी सांगितले.
त्यानंतर शाहीर वामन बावळे यांच्या हस्ते शाहिर संतोष साळुंखे आणि त्यांचे सहकारी, शाहिर बजरंग आंबी, शाहिर सुभाष गोरे आणि त्यांचे सहकारी यांचा सन्मान करण्यात आला. 
शाहिर संतोष साळुंखे यांनी 'शिवचरित्रावर पोवाडा' आणि 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत आणि शाहिर बजरंग आंबी आणि शाहिर सुभाष गोरे यांनी त्यांच्या सहकार्यांसह आपल्या पहाडी आवाजात पोवाडे सादर करून रसिक श्रोत्यांची दाद मिळवली. 
शिवकालीन युगात मिडियाचे काम करणार्या शाहिरांनी सोलापूरमध्ये तीन दिवसाच्या शाहिरी महोत्सवात शाहिरी कला जिवंत ठेवण्याचे महत्वाचे काम केले. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि संचालक श्रीराम पांडे यांच्या नियोजनातून हा शाहिरी महोत्सव सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेला होता.
सोमवारी या शाहिरी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शाहिर सुरज राऊळ, शाहिरा मंगल दळवी, शाहिर कल्याण काळे आणि त्यांच्या सहकर्यांनी तसेच दुसर्या दिवशी शाहिर गणेश गलांडे, शाहिरा प्रा. संगीता मावळे आणि शाहिर राजेंद्र कांबळे आणि त्यांच्या सहकार्यांनी पोवाडे आणि लोककला सादर करत गोंधळ घातला. 
गेले तीन दिवस हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये संबळ, ढोल, डफ, हलगी, चिपळी, टाळ, घुंगरू या वाद्यांचा आवाज घुमत होता. परिसरात रांगोळी काढून आकर्षक सजावट करण्यात आलेली होती तर शहरातील विविध भागात डिजिटल बॅनर लावण्यात आलेले होते.
या शाहिरी महोत्सवासाठी तीन दिवसामध्ये अनेक मान्यवरांनी हजेरी लावलेली होती. समारोपाच्या दिवशी शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे, शाहिर खाडे, पत्रकार शिवाजी सुरवसे, पत्रकार शंकर जाधव आणि रवि हलसगीकर यांच्यासह अबाल-वृध्दांनी हजेरी लावली होती.
******
