सोलापूर : महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग, वै. मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ, आळंदी देवाची आणि सोलापूर जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने भिंती पलिकडंच्या बंदी बांधवांचे किर्तनातून प्रबोधन व्हावे, या उददेशाने ह.भ.प. श्री. निलेश महाराज झरेगांवकर यांच्या भक्तीमाधुर्यात सोमवारी, 06 जुलै रोजी प्रासादिक किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 
हा कार्यक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे सुहास वारके यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष कारागृह महानिरीक्षक (मुख्यालय) योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) सुनिल ढमाळ यांच्या प्रेरणेने सोलापूर जिल्हा कारागृहामध्ये घेण्यात आला.
या प्रासादिक किर्तन सोहळ्यामध्ये ह. भ. प. निलेश महाराज झरेगांवकर यांनी रामायण व महाभारत यामधील विविध मार्मीक उदाहरणे देऊन, जीवनात झालेली चूक आणि जीवनातील नकारात्मक विचार दूर ठेऊन यापुढे चांगले सन्मार्गाने जीवन जगावे, तसेच महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनातील विविध प्रसंग, विविध घटना याबाबत प्रासादिक किर्तन सोहळ्याच्या माध्यमातून बंदी बांधवांना प्रबोधन करण्यात आले.
या किर्तन सोहळ्याकरिता पेटीवादक कैलास चिंचोलकर, तबला वादक रामचंद्र गवळी, गायक दत्ता पाथरूड यांनी साथ दिली. किर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमाकरिता कारागृह अधीक्षक सुशिल कुंभार, वरिष्ठ तुरूंगाधिकारी बिरू खळबुटे, कारागृह शिक्षक अंगद गव्हाणे, वारकरी सेवा संघाचे जिल्हाप्रमुख अमोल सुतार तसेच कारागृह अधिकारी व कर्मचारी तसेच बंदीबांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कारागृह शिक्षक अंगद गव्हाणे यांनी केले तर कारागृह अधीक्षक सुशिल कुंभार यांनी आभार प्रदर्शन केले. संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
