सोलापूर : फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी शारीरिक संबंध केल्याच्या आरोपावरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचने अटकपूर्व जामीन अर्ज मंजुर केला.
या प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीचा विवाह तिच्या आई-वडिलांनी लावून दिला होता. पीडितेचा नवरा कामावर गेल्यानंतर आरोपी हा तिच्या घरासमोर घुटमळत असताना पीडितेने त्याला एके दिवशी घरी चहासाठी बोलावलेले असताना अचानक आरोपीने तिच्यावर तिचे इच्छेविरुध्द शरीर संबंध केला, त्यानंतर ते फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन पुन्हा तिच्याबरोबर तिच्या इच्छेविरुध्द शरीर संबंध केला, असं सरकार पक्षाचे म्हणणे होते.
या प्रकरणी दाखल पंढरपूर सत्र न्यायालयाने गुन्ह्यात आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालय सर्कीट बेंच कोल्हापूर येथे ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या जामीन अर्जाची सुनावणी कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मेहरोज पठाण यांच्यासमोर झाली.
आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये पीडिता ही आरोपीवर एकतर्फी प्रेम करत होती, व तिने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती रोज आरोपीला 30-40 वेळा फोन करत होती, आरोपीला व्हॉटसअप मेसेज पाठवत होती.
ही बाब तिच्या पती आणि सासूच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला तिच्या आई वडिलांकडे पाठवून दिले. आई-वडीलांच्या दबावामुळे तिनं फिर्याद दाखल झाली आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने, सरकारतर्फे ॲड. एस. एन. देशमुख यांनी तर मूळ फिर्यादीतर्फे ॲड. ट्विंकल कोठवडेकर यांनी काम पाहिले.
