सोलापूर : हुमनाबादकडे निघालेली क्रेटा गाडी विजापूर रोडवरील न्यु अंबर हॉटेल या ठिकाणी पाठीमागून आलेल्या एका रिक्षातील अज्ञातांनी कारमधील प्रवाशाच्या डोळ्यात चटणी टाकून आणि चाकूच्या धाकाने 27 ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या आणि वाहनाची चावी काढून निघून गेलेल्या तिघा चोरट्याना गजाआड करण्यात शहर गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय. त्या त्रिकूटाच्या ताब्यातून 04, 35, 600 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्यांच्या अटकेमुळे अन्य गुणी उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय.
02 जुलै रोजी मल्लिकार्जुन विश्वनाथ कोणी व त्यांचा मित्र शांतकुमार रेवणप्पा येडवे ( दोघे रा. बिदर) असे दोघे मिळून विजापुरातील लग्न कार्यक्रम आटोपून सोलापूरमार्गे हुमनाबाद कडे निघाले होते. हायवेवर रात्रीच्या वेळी त्यांची कार रस्त्यात अडवून डोळ्यात चटणी टाकून आणि गळ्यावर चाकू लावून त्यांच्याजवळील 03 सोन्याच्या अंगठ्या जबरदस्तीने चोरून नेल्या होत्या. त्यावेळी ते चोरटे कारची चावी जबरदस्तीने हिसकावून नेली होती. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तिघा अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
07 जुलै रोजी गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शंकर धायगुडे, स.पो.नि. भरत चंदनशिव आणि त्यांच्या तपास पथकाने मालाविषयी गुन्हे करणारे आरोपींचा सोलापूर शहर हद्दीत शोध घेत असताना मिळालेल्या गोपनिय माहितीतून विजापूर हायवेवर रात्रीच्या वेळी रिक्षातून येऊन क्रेटा गाडी अडवून त्या गाडीतील दोघा इसमांचे डोळ्यामध्ये चटणी टाकून 03 अंगठ्या चोरी केलेले तिन इसम विजापूर नाका कंबर तलाव येथिल झाशीची राणी पुतळ्याजवळील मोकळे मैदानात सोलापुर येथे रिक्षा क्र. एमएच 13 सीटी 9269 मध्ये सोने विक्री करीता एकत्रित थांबलेले असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार स.पो.नि. शंकर धायगुडे, स.पो.नि. भरत चंदनशिव व त्यांचे तपास पथक त्या ठिकाणी जावून संशयीत इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांची नाव व पत्ते विचारले असता, शिवाजी ऊर्फ मरक्या मोहन जाधव (वय-34 वर्ष), महादेव ऊर्फ मंड्या मोहन जाधव (वय- 25 वर्ष) आणि अमित ऊर्फ इंडीया हरीशचंद्र पवार (वय- 33 वर्ष,सर्व राहणार प्रताप नगर तांडा.) अशी असल्याचे सांगितले.
त्यावेळी सोबत असलेल्या पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता, शिवाजी ऊर्फ मरक्या मोहन जाधव याचे पॅन्टीच्या खिशात पांढऱ्या रंगाचा खडा असलेली पिवळ्या धातूची अंगठी मिळून आली. त्याच्या डाव्या खिशात मोटार कारची चावी आणि एक ओपो कंपनीचा मोबाईल फोन मिळाला. या अंगझडतीत महादेव ऊर्फ मंड्या मोहन जाधव याचे खिशात काळ्या रंगाचा खडा असलेली पिवळ्या धातूची अंगठी मिळाली, तर अमित ऊर्फ इंडीया हरीशचंद्र पवार याच्या खिशात लाल रंगाचा खडा असलेली पिवळ्या धातूची अंगठी मिळाली.
त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारणा केली असता, शिवाजी ऊर्फ मरक्या मोहन जाधव याने सांगितले की, "मी, माझा भाऊ महादेव ऊर्फ मंड्या मोहन जाधव, व मित्र अमित ऊर्फ इंडीया हरीशचंद्र पवार असे मिळून 04 दिवसापूर्वी रात्रीच्या वेळी विजापूर रोड हायवेवर एक क्रेटा मोटार कार अडवून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकली. त्यावेळी मी माझ्या जवळील चाकू त्या व्यक्तीच्या गळ्याला लावला. त्यानंतर आम्ही तिघांनी मिळून त्या व्यक्तींच्या हाताच्या बोटातील 03 सोन्याच्या अंगठ्या आणि क्रेटा मोटार कारची चावी जबरदस्तीने काढून घेऊन माझ्या रिक्षातून तेथून निघून गेलो असल्याचेही सांगितले.
या गुन्ह्यातील 03 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 27 ग्रॅम वजनाचे 03 सोन्याच्या अंगठ्या, चाकू, मिरची पावडर, ऑटो रिक्षा, मोबाईल फोन आणि फिर्यादी यांच्या क्रेटा कारची चावी, असा एकूण 04, 35, 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीतील शिवाजी उर्फ मरक्या मोहन जाधव याच्या विरूध्द यापूर्वी विजापूर नाका पो.स्टेशनकडे भा.द.वि.सं. कलम 395, 354 (अ), 452, 34 आणि मंद्रुप पो.स्टेशनकडे भा. दं. वि. सं. क. 394 अन्वये तसेच नमूद गुन्ह्यातील उर्वरीत 02 आरोपींची गुन्हेगारी अभिलेखाची माहिती संकलित केली जात असल्याचं सांगण्यात आलंय.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने, व. पो. नि. गुन्हे (अति. कार्यभार) अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शंकर धायगुडे, स.पो.नि.भरत चंदनशिव व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश भोसले, जावेद जमादार, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, वसिम शेख, अभिजीत धायगुडे, काशिनाथ वाघे, आबा सावळे, धिरज सातपुते, अजिंक्य माने, विठ्ठल यलमार, चालक सतिश काटे, बाळु काळे, सायबर पो.स्टे. कडील प्रकाश गायकवाड आणि मच्छींद्र राठोड यांनी पार पाडली.
