विडी घरकुलातील घरफोडीचे 02 गुन्हे उघडकीस; सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनिय कामगिरी

shivrajya patra

                                         (छायाचित्र : ChatGPT)

आरोपीविरुध्द आजवर 35 गुन्हे दाखलचा आलेख 

सोलापूर : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण) यांनी जिल्ह्यातील मालाविषयी गुन्ह्यांचा उकल करणे आणि पाहिजे फरारी आरोपी जेरबंद करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेशित केले होते. पोलीस निरीक्षक जगताप यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांच्या पथकानं मालाविषयी विडी घरकुलसह 02 गुन्ह्यांचा उकल करण्यात यश मिळवलंय. त्यांच्या कडून 1,50,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलंय.

गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ आणि त्यांचे पथक मालाविषयी गुन्ह्याचे उकल करण्याच्या अनुषंगाने मोहोळ पोलीस ठाणे येथील शिवाजी चौकातील ब्रिजखाली हजर असताना पथकातील पोलीस अंमलदार प्रमोद शिंपाळे आणि योगेश जाधव यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, मौजे मोहोळ तालुक्यातील ढोकबाभूळगांव येथील रेकॉर्डवरील आरोपी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विडीघरकुलात घरफोडी चोरी केली असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. 

ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांना कळविली असता, त्यांनी सपोनि ज्ञानदेव वाघ यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. सपोनि ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक मोहोळ तालुक्यातील ढोकबाभूळगांवात आले.

तेथे दिसलेल्या एका संशयितास सपोनि ज्ञानदेव वाघ यांनी त्यास ताब्यात घेऊन त्यांचं नांव विचारता त्यानं प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडं सपोनि वाघ यांनी कसून चौकशी केली असता, बंडू उर्फ बंदेनवाज मधूकर पवार (वय 25 वर्षे, रा. ढोकबाभूळगांव) असं असल्याचं सांगितले. 

त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करता, त्यानं मागील 03 महिन्याखाली त्याचा साथिदार उमेश प्रकाश काळे (रा. मलिक पेठ) याच्यासोबत कुंभारी विडीघरकुलात रात्रीच्या वेळी 02 घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितले. 

त्याबाबत वळसंग पोलीस ठाण्याकडील बीएनएस 2023 चे कलम 331(2), 331(3), 331(4), 305 (अ) प्रमाणे तसेच वळसंग पोलीस ठाण्याकडील एका गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि 110 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त केले. 

हा आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मालमत्ता चोरीचे एकूण 35 गुन्हे दाखल आहेत, असं तपासात पुढं आलंय.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोहेकॉ शशिकांत कोळेकर, नागेश कोणदे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार दिनेश पवार, प्रमोद शिंपाळे, अक्षय डोंगरे, योगेश जाधव, जगदीश राठोड, प्रमोद शिंपाळे, योगेश जाधव, सतिश बुरकुल, महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोटे यांच्या पथकाने बजावली.

*****

To Top