सोलापूर : येथील पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावर गुन्हे करणारी टोळी अशी नोंद असलेल्या मंठाळकर टोळीतील तिघासह चौघा जणांना सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्ह्यातून 02 वर्षाकरीता तडीपार करण्यात आलंय.
टोळी प्रमुख नागेश यलप्पा मंठाळकर (वय-25 वर्षे), अनिल श्रीनिवास विटकर (वय-22 वर्षे) शुभम तानाजी धोत्रे, वय-21 वर्षे, सर्व रा. कुचन हायस्कुल शेजारी, रविवार पेठ, सोलापूर ग) आणि विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील अप्पाशा उर्फ अप्पु भिमशा मुगळी (वय-34 वर्षे) अशी तडीपारांची नावे आहेत.
मंठाळकर टोळीतील तिघाविरुद्ध सन 2022, 2024, 2025 आणि 2026 या कालावधीत टोळीच्या माध्यमातून आपखुशीने दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, घातक शस्त्र जवळ बाळगून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्याविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता.
प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर यांनी कार्यवाही करुन टोळीतील तिघांना तर विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील प्रस्तावानुसार अप्पाशा उर्फ अप्पु भिमशा मुगळी (वय-34 वर्षे) याला तडीपार करण्यात आले.
विजापूर रस्त्यावरील शिंगारे वीट भट्टी पाठीमागील वसंत नगरातील रहिवासी अप्पाशा उर्फ अप्पु भिमशा मुगळी (वय-34 वर्षे) याच्याविरुध्द सन 2023, 2024, 2025 आणि 2026 या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गोवंशीय जनावरांचे कत्तलीच्या अनुषंगाने सामान्य नागरीकांना शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्यासही सोलापूर शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलंय.
