दिव्यांग सक्षमीकरण बैठक... एक ही दिव्यांग व्यक्ती शासकीय योजनापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या - अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी

shivrajya patra

सोलापूर/30 : जिल्ह्यातील दिव्यांगासाठी असलेल्या विविध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत या दृष्टीने सर्व शासकीय विभागांनी प्रयत्न करावेत. तसेच शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील एकही दिव्यांग व्यक्ती शासकीय योजना व लाभांपासून वंचित राहणार नाही, याची संबंधित सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग सक्षमीकरण बैठकीत निऱ्हाळी मार्गदर्शन करत होते. 

यावेळी उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, सह आयुक्त नगरपालिका प्रशासन अशिष लोकरे, जिल्हा दिव्यांग अधिकारी सुलभा वटारे, संजय गांधी योजनेचे तहसिलदार शिल्पा पाटील, कामगार कल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या प्रिती पासकंटी, प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी सुहास गुरव, अशासकीय सदस्य दत्तात्रय मोकाशी यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

निऱ्हाळी पुढे म्हणाले की, दिव्यांगांना वैयक्तिक लाभ दिला जात असेल तर तो चांगलाच असून, जिल्ह्यातील दिव्यांगांची एकूण संख्या विचारात घेऊन खर्चाच्या अनुज्ञेय बाबीनुसार  अधिकाधिक चांगल्या कामाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिष्यवृत्तीमध्ये ऑनलाईन/ऑफलाईन प्रक्रियेमुळे निर्माण होणारी संदिग्धता दूर करून, पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून उदिष्टपूर्ती साध्य करावी, असेही त्यांनी सुचित केले.

सर्व शासकीय इमारती, कार्यालय यामध्ये दिव्यांगांना सहज प्रवेश करता यावा, यासाठी रॅम्प, व्हीलचेअर, कमोड शौचालय, दिशादर्शक फलक इत्यादी अत्यावश्यक बाबींची योग्य अंमलबजावणी करण्याबाबतही अपर जिल्हाधिकारी निऱ्हाळी यांनी सूचना दिल्या.

यावेळी बैठकीत दिव्यांग विवाह प्रोत्साहन अनुदान, शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींना लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य बीज भांडवल योजना, पूर्व माध्यमिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, जिल्हा परिषद 05 टक्के सेस फंडातून शेळी गट, झेरॉक्स मशीन, मिरची कांडप व ई-बाईक अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

*****

To Top