SIR मोहिमेच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांचं पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
सोलापूर / 27 : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेकडे काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथ प्रमुखांनी अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असं प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियानाच्या अनुषंगाने सोलापूर शहर व जिल्हा (पूर्व) काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी 27 ते 29 जून दरम्यान जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर जिल्हा व लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी BLA-2, बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.
या तीन दिवसीय प्रशिक्षण मालिकेअंतर्गत आज 251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर काँग्रेस भवन, सोलापूर येथे पार पडले. या शिबिराचे उद्घाटन सोलापूरच्या लोकप्रिय खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटनपर भाषणात खासदार शिंदे बोलत होत्या.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षिका रोहिणी धोत्रे यांनी SIR प्रक्रियेची सविस्तर माहिती देत मतदार नोंदणी, पडताळणी, दुरुस्ती, नवीन मतदारांची नोंदणी तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याबाबत मार्गदर्शन केले.
शिबिराचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केले, तर दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष भीमाशंकर जमादार आणि उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष भारत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सोलापूर जिल्हा, लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुका आणि प्रत्येक मतदान केंद्रावर काँग्रेसचे मतदान केंद्र प्रतिनिधी (BLA) यांनी मतदान केंद्र अधिकारी (BLO) यांच्याशी प्रभावी समन्वय ठेवून काम करावे, असं खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले.
मतदार यादीत पात्र मतदारांची नावे समाविष्ट करणे, मयत, स्थलांतरित किंवा सातत्याने गैरहजर असलेल्या व्यक्तींची नावे नियमांनुसार वगळणे, चुकीच्या अथवा दुबार नोंदी दुरुस्त करणे आणि संपूर्ण प्रक्रिया वस्तुनिष्ठ व पारदर्शक पद्धतीने पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, मतदार यादी ही लोकशाहीची आत्मा असून तिची अचूकता आणि विश्वासार्हता जपणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. आजपासून तीन दिवस सोलापूर जिल्हा व लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथवरील BLA प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक प्रतिनिधीनं तळागाळापर्यंत पोहोचून प्रभावीपणे काम करणे गरजेचे आहे.
काँग्रेस, पुरोगामी, विरोधी पक्षांच्या विचाराचे मतदार वगळण्याचे कट कारस्थान SIR प्रक्रियेच्या माध्यमातून भाजप करत आहे. बिहार, पश्चिम बंगाल आणि ओरिसा या राज्यांमध्ये ते दिसून आलं आहे, असा आरोपही खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.
काँग्रेस व पुरोगामी विचारांच्या मतदारांची नावे भाजपच्या कारस्थानामुळे, तांत्रिक कारणांमुळे किंवा दुर्लक्षामुळे वगळली जाणार नाहीत, याची प्रत्येक कार्यकर्त्यानं दक्षता घ्यावी. भाजपला जनतेच्या हिताशी त्यांच्या अडचणीशी, विकासकामांशी काहीही देणे-घेणे नाही, फक्त जाती धर्माचे राजकारण करत असते. म्हणून लोकशाही, संविधान आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटले.
विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराचा हक्क सुरक्षित राहावा आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व सक्षम व्हावी, यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे," असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
सर्व काँग्रेस पदाधिकारी, BLA-2 प्रतिनिधी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांना SIR मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून लोकशाही प्रक्रियेला अधिक बळकटी देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आपल्या विचाराचा एकही मतदार तांत्रिक कारणामुळे किंवा दुर्लक्षामुळे वगळला जाणार नाही, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सजग राहून जबाबदारीने काम करावे, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भारत जाधव, माजी सभापती बाबा मिस्त्री, माजी महापौर सुशीला आबुटे, प्रदेश सचिव सुरेश हावळे, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, VJNT जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण भोसले, दत्तात्रय खडतरे, महेश आठवले, सचिन गुंड, अॅड. केशव इंगळे, मोतीराम चव्हाण, विनोद पाटील, श्रीशैल पाटील, राधाकृष्ण पाटील, सिद्राम सलवदे, अॅड. संजय गायकवाड, भीमाशंकर टेकाळे, बाबुराव म्हेत्रे, तिरुपती परकीपंडला, लक्ष्मण माशाळे, अब्दुल खलील मुल्ला, शिवशंकर अजनाळकर, कालिदास काळपगार, हणमंतू जावीर, सचिन पवार, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, समीर विजापूरे, धीरज खंदारे, दिनेश म्हेत्रे, दाजी गोफणे, अर्जुन कादे, शरद चंदनशिवे, नागेश म्याकल, व्यंकटेश बोमेन, नरेश महेश्वरम्, छाया हिरवटे, पप्पू गारे, लक्ष्मण बनसोडे, बाबुराव खलिफे, मारुती भोसले, आमिर शेख, श्रीशैल रणखांबे, निशा मरोड, शांताबाई कांबळे, किसन पाटोळे, श्याम वाघमारे, अप्पाशा आयवळे, सुमित अवताडे, विशाल वाघमारे, अमोल पांढरे, मिजाज जहागिरदार, जयवंत कोळी, अनिता भालेराव, मीना गायकवाड यांच्यासह BLA 2, बूथ प्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
