सोलापूर: येथील चार हुतात्मा पुतळ्यालगत नियोजित राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकासाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यात आले.
सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या जुळे सोलापुरातील संपर्क कार्यालयाजवळ पालकमंत्री गोरे यांनी रविवारी सायंकाळी धावती भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. 
यावेळी पालकमंत्री गोरे यांना सुपुत्र संभाजी शंभूराजे हे पुस्तक देऊन व सोलापूर शहरात राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी कुठेच पुतळा किंवा स्मारक नाही महानगरपालिकेच्या चार हुतात्मा पुतळ्यालगत राष्ट्रमाता जिजाऊ यांचे स्मारक व्हावे, त्यासाठी शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. पालकमंत्र्यांनी निवेदन स्वीकारून मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
