सोलापूर/28 : सोलापूर जिल्ह्यात रविवारी, 28 जून रोजी राबवण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत एकूण 4,00,215 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला असून जिल्ह्याचे 91.66 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. जिल्ह्यात 0 ते 5 वर्षांखालील अपेक्षित 4,36,598 बालकांपैकी 4,00,215 बालकांना म्हणजेच 91.66 टक्के बालकांना पोलिओ लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी दिली.
यामध्ये ग्रामीण भागातील अपेक्षित 4,36,598 पैकी 4,00,215 बालकांना लस देण्यात आली असून 91.66 टक्के उद्दिष्ट साध्य झाले. शहरी भागात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील अपेक्षित 43,667 पैकी 37,771 बालकांना म्हणजेच 86.50 टक्के, सोलापूर महानगरपालिका हद्दीतील अपेक्षित 1,06,043 पैकी 93,344 बालकांना म्हणजेच 88.02 टक्के लसीकरण पूर्ण झाले.
मोहिमेसाठी ग्रामीण भागात 5,570, शहरी भागात 570 व महानगरपालिका भागात 373 असे एकूण 6,513 लसीकरण बूथची सोय करण्यात आली होती. लसीची मात्रा देण्यासाठी 7,222 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. पर्यवेक्षणासाठी वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली होती.
बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, बाजार, विटभट्ट्या, साखर कारखाने, यात्रा, लग्न समारंभ या ठिकाणी पोलिओ डोस पाजण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. भटक्या वसाहती आणि ऊसतोड कामगारांच्या वसाहतीतील बालकांसाठी मोबाईल टीम कार्यरत होत्या.
वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे जनजागृती, प्रचार व प्रसिद्धी, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलाखती तसेच आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटीद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने 91.66 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले.
उर्वरित बालकांचे लसीकरण ग्रामीण भागात तीन दिवसांच्या गृहभेटींद्वारे व शहरी भागात पाच दिवसांच्या गृहभेटींद्वारे (आय.पी.पी.आय.) पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी दिले.
