रोटरीच्या जागतिक सहकार्याने अत्याधुनिक नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) लोकार्पित
नवजात बालकांना जीवनदान देणारा महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प साकार
सोलापूर : नव्यानं लोकार्पित होत असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागमुळे नवजात बालमृत्यू कमी होण्यास मोठी मदत होणार असून, हजारो बालकांना सुरक्षित व निरोगी जीवनाची नवी संधी मिळणार आहे, असं प्रतिपादन प्रकल्प समन्वयक रो. इंजि. अजय डोईजोडे यांनी केले.
माता व नवजात बालकांच्या आरोग्यसेवेला नवी दिशा देणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) आज महिला व नवजात शिशु रुग्णालय, सोलापूर येथे रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे प्रांतपाल रो. सुधीर लातुरे यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिस्ट्रीक्ट रोटरी फाऊंडेशन कमिटीचे रो. स्वाती हेरकल होत्या. 
रोटरी ई-क्लब ऑफ सोलापूर इलाइटच्या पुढाकारातून आणि जागतिक सहकार्याने साकार झालेला हा प्रकल्प सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरणार आहे.
यावेळी डॉ. तेजस्वी धवळे, डिस्ट्रीक्ट गर्व्हनर इलेक्टेड रो. जयेश पटेल, डॉ. क्षीरसागर आणि डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोलापूर जिल्हा व परिसरातील अकाली जन्मलेली, कमी वजनाची तसेच गंभीर आजारी नवजात बालकांसाठी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे, असं प्रकल्प समन्वयक रो. इंजि. अजय डोईजोडे यांनी प्रकल्पाची माहिती देताना सांगितले.
या प्रकल्पासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ नोवी, अमेरिका, टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन आणि पालव संस्थांचे विशेष आभार मानले. त्यांच्या उदार आर्थिक व सामाजिक सहकार्यामुळे जागतिक दर्जाचा हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होऊ शकला, असं त्यांनी यावेळी नमूद केले.
प्रांतपाल रो. सुधीर लातुरे यांनी आपल्या मनोगतात रोटरीच्या "Service Above Self" या ब्रीदवाक्याचा उल्लेख करत समाजहितासाठी अशा शाश्वत आणि परिणामकारक सेवा प्रकल्पांची गरज अधोरेखित केली.
डिस्ट्रीक्ट रोटरी फाऊंडेशन कमिटीचे रो. स्वाती हेरकल यांनी ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून साकार झालेल्या या प्रकल्पामागील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व स्पष्ट करत रोटरीच्या सेवाभावी कार्याची गौरवपूर्ण परंपरा अधोरेखित केली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्वेता साबू यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी ई-क्लब ऑफ सोलापूर इलाइट यांनी केले होते. यावेळी क्लबचे अध्यक्ष रो. इंजि. बालमुकुंद राठी, सचिव रो. रोशन भुतडा, खजिनदार रो. राहुल डांगरे, रो. वेंकटेश सोमाणी, रो. अतुल सोनी, रो. अक्षय झवेरी, रो. राजन व्होरा आणि रो. केदार कहाते उपस्थित होते.
