सोलापूर : सार्वजनिक रस्त्यावर एकमेकांस मारामारी व झोंबाझोंबी करून दंगल करीत असलेल्या चौकडीला पोलीस अधिकाऱ्यानं विचारणा केली असता, त्यांना अरेरावीची भाषा वापरत धक्काबुक्की करुन बघून घेण्याची धमकी देण्यात आली ही घटना मजरेवाडी क्रॉस रोडवर बुधवारी पहाटे पाऊणे एक वा. च्या सुमारास घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी सिध्दाराम सुभाषय्या स्वामी याच्यासह चौकडीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.
महेश शिवपुत्र हिचगे, सागर श्रीकांत हत्तुरे आणि अनिकेत शंकर बनसोडे ( सर्व रा. सोलापूर) अशी अन्य आरोपींची नावे आहेत. हे चौघे जण मजरेवाडी क्रॉस रोड येथील अनिश बिअर बारमध्ये दारू पिऊन झाल्यावर बिलाच्या कारणावरून रस्त्यावर दारूचे नशेत एकमेकांस झोंबाझोंबी करुन मारहाण करीत होते.
त्यावेळी क्रॉस रोडवर कर्तव्य बजावत असलेल्या सपोनि मस्के यांनी, त्यांना विचारणा केली. त्यावेळी त्या चौघांनी अरेरावीची भाषा करून अंगावर धावून येऊन पाठीमागे जोरात ढकलून देत 'तुला बघून घेईन' अशी धमकी दिली.
सपोनि मस्के आणि पोकॉ/1760 वाघमारे शासकीय कर्तव्य पार पाडीत असताना धमकावून हल्ला करून शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी पोकॉ वाघमारे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार त्या चौकडीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात
भा.न्याय संहिता कलम १३२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
