सोलापूर : अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन सुनेचा खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून मोहोळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असलेली सासू संगीता सलवदे हिच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मेहरोज पठाण यांच्यासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
फिर्यादीचे लग्न सचिन सलवदे याच्याबरोबर 2019 साली झाले होते. 21 एप्रिल 2025 रोजी भांडणांमध्ये सासूने आपल्या अंगावर रॉकेल टाकून खून करण्याचा प्रयत्न केला, असं सरकार पक्षाचे म्हणणे होते. सासू संगीता सलवदे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर सेशन्स कोर्टाने फेटाळून लावला होता. 
या निकालाविरुद्ध आरोपीने ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी असा युक्तिवाद केला की, फिर्यादी ही अपघाताने भाजलेली होती, हे दवाखान्यातील कागदपत्रांवरून स्पष्टपणे दिसून येते.
त्यानंतर भाजलेल्या जखमेचा गैरफायदा घेऊन तिने सासूला गुंतवलेले आहे, हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपी सासू संगीता सलवदे हिचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला, त्याचवेळी तिला पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲड. नितीन पाटील यांनी काम पाहिले.
