संकेत पवार यांचं एम. बी. बी. एस. परीक्षेत यश
सोलापूर : वैद्यकीय क्षेत्रातील सेवेच्या माध्यमातून डॉ. संकेत पवार यांनी समाजासाठी मोलाचे योगदान द्यावं, अशी अपेक्षा मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली.
येथील संकेत सदाशिव पवार यांनी एम. बी. बी. एस. पदवी यशस्वीरित्या संपादन करून कुटुंबासह संपूर्ण परिवाराचे नाव उज्वल केलं आहे. त्यांच्या यशाप्रित्यर्थ मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील बोलत होते.
जिद्द प्रयत्न आणि अभ्यासातलं सातत्य यामुळे हे यश संपादन करता आलं. एम.बी.बी.एस. नंतर पुढे शिक्षण चालू ठेऊन दर्जाची रुग्ण सेवा करण्याचा मानस डॉ. संकेत यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला.
डॉ. संकेत यांचे वडील सदाशिव पवार हे मराठा सेवा संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. समाजसेवेचा धडा संकेतने वडीलाकडून घेतला आहे. 
यावेळी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. संकेत यांच्या यशाबद्दल नातेवाईक, मित्र परिवारामधून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
