सोलापूर : फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेच्या माजी अध्यक्षा तसेच प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. मंजुश्री कुलकर्णी यांचं वयाच्या 79 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी, 12 जून रोजी सकाळी येथील मोदी स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. आपल्या सेवाभावी वृत्ती, मनमिळावू स्वभाव, मितभाषी व्यक्तिमत्त्व आणि रुग्णांप्रती असलेल्या आत्मीयतेमुळे "जनतेच्या डॉक्टर" अशी त्यांची जनमाणसात ओळख होती.
डॉ. मंजुश्री कुलकर्णी यांनी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेत विविध पदांवर कार्यरत राहून संस्थेच्या प्रगतीसाठी आणि शाखेचे नाव जनमानसात पोहोचविण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेचे कार्यकारिणी मंडळ व कर्मचारी वृंद यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
