बस स्टॅन्ड परिसरातील वृद्धाच्या खूनाच्या गुन्ह्यात दोघे आरोपी 24 तासात गजाआड; एक विधीसंघर्षग्रस्त बालकही ताब्यात

shivrajya patra

सोलापूर/सोहेल शेख : येथील बस स्टॅन्ड परिसरात बुधवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या वृद्धाच्या खूनाच्या गुन्ह्यात खून करुन फरार झालेले दोन आरोपी आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक 24 तासात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने ताब्यात घेतले. कुणाल किसन कांबळे आणि अमन सुधाकर जेटीथोर अशी अटकेतील आरोपींची नांवं आहेत.

सोलापूर एस.टी. स्टॅन्ड येथील फलाट क्रं.23 च्या बाजूस अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन कशाच्या तरी साह्याने डोक्यात मारुन जखमी करुन कृष्णाप्रसाद व्ही या वृद्धास जिवे ठार मारले. या प्रकरणी मृताची मुलगी सौ. प्रकृती कृष्णाप्रसाद (रा. मुदतमिलनगर, मालुमिचमपट्टी जि. काईम्बतूर राज्य तामिळनाडू) हिने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ती 10 जून रोजी वडीलासोबत हैद्राबाद येथून सोलापूरमार्गे सातारा शहराकडे निघाली होती. 

तिच्या फिर्यादीवरुन, 11 जून रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भा. न्या. संहिता कलम १०३ अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत करीत आहेत.

या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम राज कुमार, पोलीस उप आयुक्त प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महादेव राऊत यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन हा गुन्हा करणाऱ्या आरोपीतांची नांवे निष्पन्न करुन त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या. 

त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी पोलीस ठाण्याकडील डी. बी. पथकाचे अधिकारी सपोनि संजय क्षिरसागर आणि त्यांच्या पथकास तात्काळ गुन्ह्याचे घटनास्थळी तपास करून, गुन्ह्याचे अनुषंगाने माहिती संकलीत केली. गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक तपास करून आरोपीतांची नांवे निष्पन्न केली. त्यानंतर निष्पन्न आरोपींच्या ठाव-ठिकाण्याबाबत बातमीदारामार्फत माहिती काढून या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी कुणाल किसन कांबळे (वय-21 वर्ष, रा. रमाबाई आंबडेकर नगर, न्यु बुधवार पेठ.), अमन सुधाकर जेटीथोर (वय-21 वर्ष, रा. आम्रपाली चौक, न्यु बुधवार पेठ.) यांना 11 जून रोजी सदर गुन्ह्यात तपासकामी अटक केली. त्याचबरोबर विधीसंघर्षग्रस्त बालकासही ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.

अशाप्रकारे फौजदार चावडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि संजय क्षिरसागर व पथकाने अवघ्या 24 तासात खुनाचा गंभीर गुन्हा उघड केला.

...... यांनी पार पाडली कामगिरी !

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-१) प्रताप पोमण, वपोनि महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोकॉ अजय चव्हाण, पोकॉ विनायक जाधव, पोकॉ अमोल खरटमल, पोह जगदीश हुल्ले, पोकॉ रवि धेंडे, पोकॉ पंकज घाडगे, पोकॉ विनोद पुजारी, पोकॉ स्वप्नील मोरे, पोकॉ नितीन मोरे, पोकॉ कुमार शेळके, पोकॉ शशिकांत दराडे, पोकॉ नानासाहेब सलगर, चालक पोकॉ पाटील यांनी पार पाडली.

To Top