सोलापूर : शेजारच्या राज्यात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने 14 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार गतवर्षी मे महिन्यापासून ते आजमितीदरम्यान येथील बेगम पेठ परिसरात घडला. महमद मुर्तुजा खरादी असं फसलेल्या पालकाचं नाव आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार जेलरोड पोलिसांकडील गुन्ह्यात इफ्तेकार इसाक कादरी (रा. उस्मानपुरा, हैद्राबाद, तेलंगणा) असं आरोपीचं नाव असल्याचं सांगण्यात आलंय.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, येथील बेगम पेठ परिसरातील रहिवासी म. मुर्तुज अ. सत्तार खरादी यांचा मुलगा खुद्दुस याला तेलंगणातील डेक्कन मेडीकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा होता. त्यावेळी एमबीबीएस करीता डेक्कन मेडीकल कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून इफ्तेकार कादरी यांनी 15 लाख रुपये घेतले, दरम्यान कादरी यांनी खरादी यांचा विश्वास संपादन केला होता. त्यातच कॉलेजचे नाव असलेले कॉलेज एक्सेप्टन्स बनावट पत्र मुर्तुज खरादी यांना दिले. 
खरादी यांनी कादरी यांना 15, 00, 000 रुपये दिले होते, मात्र एमबीबीएस करिता डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने दिलेली रक्कम परत मागितली असता, त्यापैकी 01 लाख रुपये परत दिले. त्यानंतर कादरी यांनी खरादी यांचा फोन उचलण्याचे बंद केले.
या प्रकरणात आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर म. मुर्तुज खरादी यांनी 14 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार भा. न्याय संहिता कलम 316(2), 318(4), 336(2), 336(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
