वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्काराने महाराष्ट्र साहित्य परिषद, दक्षिण सोलापूर शाखेचा पुण्यात सन्मान

shivrajya patra

शानदार पुरस्कार सोहळ्याला सोलापूरकरांची मोठी हजेरी

सोलापूरची अश्‍विनी चव्हाण यांना उत्कृष्ठ कार्यकर्ता 

सोलापूर : आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जाहिर करण्यात आलेल्या राजन लाखे पुरस्कृत कै. बाबुराव लाखे स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद वैशिष्ट्यपूर्ण शाखा म्हणून सोलापूरच्या महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण शाखेला गौरवण्यात आले. 

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवारी, 26 मे रोजी झालेल्या या शानदार सोहळ्यात ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते तर ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक ऋषिकेश जोशी, संगीतकार पं. सत्यशील देशपांडे, मसाप पुणे चे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मसाप दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे यांनी पुरस्कार स्विकारला. 

यावेळी अविनाश महागांवकर, नगरसेवक सात्विक बडवे, सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, श्रुती वडकबाळकर, अ‍ॅड. जे. जे. कुलकर्णी यांच्यासह राज्यभरातील साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या 120 वर्षापासून मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धन करत अनेक अनेक थोर लेखक, साहित्यिक यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ही संस्था संपूर्ण देशात नावारुपाला आणली. संपूर्ण राज्यात तसेच देशात आणि परदेशातही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखांचा विस्तार झालेला आहे. 

त्यातच सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक शाखा आहेत. या सर्व शाखांमधून अनेक चांगले उपक्रमाचे आयोजन करण्यात येऊन मराठी साहित्य आणि संस्कृतीचे जतन केले जात आहे. परिषदेच्या 121 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दरवर्षी अनेक पुरस्काराचे वितरण होते त्याच अनुषंगाने यंदाच्या वर्षीचा राजन लाखे पुरस्कृत कै. बाबुराव लाखे वैशिष्ट्यपूर्ण शाखेचा पुरस्कार सोलापूरच्या दक्षिण शाखेला जाहिर करण्यात आला.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरकडून कार्यक्रमाचे नेटके नियोजन, शिस्तबध्दता, तेच तेच पणा न आणता विविधता आणून प्रत्येकवेळी नवनवीन संकल्पना राबवणे, जास्तीत-जास्त आणि नव नवे कार्यक्रम प्रेक्षकांपर्यत पोहोचवणे, पारंपारिक पध्दती सोबतच आधुनिकतेचा समावेश करणे, कार्यक्रमाचे आयोजन करताना वेळेचे योग्य नियोजन आणि दिलेल्या वेळेतच कार्यक्रम सुरू करून समारोप करण्याची परंपरा, वर्षभरात राबवलेल्या कार्यक्रमाचे अवलोकन करून वेळोवेळी त्याचा हिशोब, ऑडीट आणि अहवाल तयार करून महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्याकडे वेळेत पाठवणे, या सर्व महत्वाच्या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवड समितीने दक्षिण सोलापूर शाखेला वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कारासाठी निवड केली.

नेहमी विविध वैशिष्ठपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शाखेचे अध्यक्ष रेणुका महागांवकर यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष प्रा. दीपक देशपांडे, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर, कार्यकारणी सदस्य प्रकाश मोकाशे, पृथा हलसगीकर यांच्यासह दक्षिण शाखेचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

मंगळवारी, 26 मे रोजी बालगंधर्व रंग मंदिरात वार्षिक ग्रंथ व विशेष ग्रंथकार पुरस्कार प्रदान सोहळा, म.सा.प. जीवन गौरव व डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करून पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील विविध साहित्यिक आणि संस्थांचा गौरव यावेळी करण्यात आला. 

सोलापूरच्या अश्‍विनी चव्हाण यांचा उत्कृष्ठ कार्यकर्ता म्हणून पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. रोख रक्कम आणि स्मृति चिन्ह असे सर्व पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी सोलापूरमधून अनेक जणांनी हजेरी लावलेली होती. 

यावेळी अंजली कुलकर्णी, डॉ. आशुतोष जावडेकर, प्रमुख कार्यवाह सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी प्रसाद मिरासदार, प्रा. माधव राजगुरू, डॉ. नीतीन संगमनेरकर, विभागिय कार्यवाह डॉ. संजीव गिरासे, जयंत येलूलकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकारी मंडळ व म.सा.प., पुणे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

To Top