सोलापूर : रात्रीचे सुमारास घरफोडी केलेल्या 02 सराईत चोरट्याना ताब्यात घेऊन घरफोडी व मोटारसायकल चोरी असे 02 गुन्हे उघड करण्यात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकास यश आलंय. विशाल दत्तात्रय तांदळे (वय-29 वर्षे) आणि त्याचा साथीदार शाहुराज बाबासाहेब कोकरे (वय-26वर्षे) अशी त्यांची नांवे असून उभयतांकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी रोख रक्कमेबरोबर 10 ग्रॅम वजनाची चांदीची चैन असा 64, 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींपैकी विशाल तांदळे हा एक महिन्यापूर्वी येरवडा कारागृहातून बाहेर आला होता, असेही सांगण्यात आले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील अभिमानश्री नगरातील पंधे अपार्टमेंटमध्ये संजय येऊलकर यांच्या राहत्या घरी,13 मे रोजी सकाळपूर्वी घरफोडी झाल्याची माहिती फौजदार चावडी पोलीस ठाण्यास मिळाली. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील कपाट तोडून 01, 00, 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करण्यात आला होता. 
घटनास्थळास सहा. पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी भेट देऊन पोलीस ठाण्याकडील डी. बी. पथकाचे प्रमुख सपोनिरी संजय क्षिरसागर व डी. बी. पथकास हा गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या. येऊलकर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान डी. बी. पथकाने त्या ठिकाणचे घटनास्थळी, आजुबाजुस चौकशी करुन सीसीटीव्ही फुटेज तपासले, घटनास्थळापासून दुरच्या एका कॅमेऱ्यात एक मोटारसायकल आल्याचे अस्पष्ट दिसत होते. मोटारसायकल आल्याचे दिशेला तपास करता, त्या ठिकाणी गॅस धारकांचे काही पेपर पडल्याचे दिसले.
त्या पेपरवरुन नमूद गॅस एजन्सीमध्ये जाऊन तपास करता, या गॅस एजन्सीत काम करणाऱ्या किसान शिंदे (रा. वसंत विहार, सोलापूर) याच्याकडे काही ग्राहकांचे गॅस कनेक्शन काढण्यासाठी दिले असल्याचे निष्पन्न झाले. किसान शिंदे यांच्याकडे तपास करता, त्यांची एच. एफ. डीलक्स मोटारसायकल घरासमोरुन 12 मे रोजी रात्री चोरीस गेल्याचे त्यांनी सांगीतले. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला.
त्यानंतर सपोनिरी क्षिरसागर व पथकाने विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पुणे हायवेवरील बाळे ब्रिज येथे संशयीत दोन आरोपीत हे नमूद मोटारसायकलवर जाताना पहाटे ०४.४५ वा सुमारास अस्पष्ट दिसले. डी. बी. पथकाने कालावधीनुसार अंदाज बांधून सोलापुर शहरातुन बाहेर जाणारे सर्व रोड व त्यावरील टोल नाके तपासले.
त्यात सोलापूर-धाराशीव रोडवरील तामलवाडी टोल नाका येथे सदर संशयीत आरोपीत दिसले, परंतु रात्रीची वेळ असल्याने पुन्हा अस्पष्ट दिसले. यानंतर आरोपीतांची गुन्हा करण्याच्या पध्दतीचा अभ्यास करुन सपोनिरी क्षिरसागर व त्यांच्या पथकाने अशा पद्धतीने गुन्हे करणारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आरोपीतांची माहीती घेतली, त्यानुसार विशाल तांदळे (रा. मंचर, पुणे) या नावाच्या आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत याच प्रकारची असून तो एक महिन्यापुर्वीच येरवडा जेलमधून सुटला असल्याची माहीती मिळाली. 
त्याप्रमाणे विशाल तांदळे व त्याचा साथीदार शाहुराज कोकरे यांनी हा गुन्हा केल्याची गोपनीय माहीती मिळाली. दोन्ही आरोपीत यांची माहीती काढली असता ते रेकॉर्डवरील घरफोडी व जबरी चोरी करणारे आरोपीत असल्याचे निष्पन्न झाले. सपोनिरी क्षिरसागर व पथक यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर (ता. आंबेगाव) येथे तपास कामी जाऊन आरोपीत विशाल दत्तात्रय तांदळे (रा. मंचर) यास ताब्यात घेतले.
त्यानंतर त्याचा साथीदार शाहुराज बाबासाहेब कोकरे (रा. घाटा पिंपरी, ता. आष्टी, जि, बीड) येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी करता, उभयतांनी दोन्ही गुन्हे केल्याची कबुल केले. व त्यांचेकडून चोरीस गेलेली एच.एफ. डीलक्स मोटारसायकल तसेच चोरीस गेलेला मुद्देमालापैकी रोख रक्कम व 10 ग्रॅम चांदीची चैन असा एकुण 64,200 रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.
.... यांनी पार पाडली कामगिरी !
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) प्रीतमकुमार यावलकर, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-01) प्रताप पोमण, आणि पोलीस ठाण्याचे पो.नि. महादेव राउत यांच्या मागदर्शनाखाली पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पथक प्रमूख सपोनि संजय क्षिरसागर, पोहवा बसवेश्वर परीट, पोना शिवानंद भिमदे, पोकॉ कृष्णा बडुरे, पोकॉ विनायक जाधव, पोकॉ पंकज घाडगे, पोकॉ विनोद व्हटकर, पोकॉ विनोद पुजारी, पोकॉ ज्ञानेश्वर गायकवाड, पोकॉ अमोल खरटमल, पोकॉ रवी धेंडे, पोकॉ अजय चव्हाण, पोकॉ सुरज सोनवलकर, पो.हवालदार अयाज बागलकोटे आणि पोकॉ मोरे यांनी पार पाडली.
