सोलापूर : नाट्यकार राम गणेश गडकरी यांच्या 'राजसंन्यास' या नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे चुकीचे सादरीकरण करून त्यांची बदनामी केल्याचा आक्षेप घेत, संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा हटवणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या ‘त्या’ चार बहादूर मावळ्यांचा पुण्यात भव्य नागरी सत्कार करण्यात आला. कोल्हापूर संस्थानचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या मावळ्यांना 'शंभूराजेंची मूर्ती' देऊन सन्मानित करण्यात आले. 
त्यांच्या धाडसी आंदोलनामुळेच आज संभाजी उद्यानात बुधभूषणकार छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा दिमाखात उभा राहू शकला, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
सोहळ्यातील मान्यवरांचे उद्गार -
"या चार मावळ्यांनी कायदेशीर कारवाईची आणि अटकेची तमा न बाळगता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वाभिमानासाठी हे धाडस केले. जर त्यांनी ते पाऊल उचलले नसते, तर आज संभाजी उद्यानात 'बुधभूषणकार' राजांचा पुतळा बसवण्याचा ऐतिहासिक मार्ग मोकळा झाला नसता, हा सत्कार त्यांच्या याच ऐतिहासिक धैर्याचा सन्मान आहे." 
पुण्यात साजरा झाला 'आनंदोत्सव' -
ज्या उद्यानातून पुतळा हटवला गेला, नेमक्या त्याच संभाजी उद्यानात आता छत्रपती संभाजी महाराजांचा दिमाखदार पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
या ऐतिहासिक विजयाचे औचित्य साधून पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य सभेत या चारही मावळ्यांचा टाळ्यांच्या कडकडाटात आणि 'छत्रपती संभाजी महाराज की जय' च्या घोषणांमध्ये शाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार अनिल भोसले, रवींद्र अण्णा माळवदकर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, माजी अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक आणि दीप्ती चौधरी यांचाही पुतळा उभारणीच्या कार्यातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, मनोज आखरे, मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे, सौरभ खेडेकर, मराठा सेवा संघाचे नवनाथ घाडगे, विकास पासलकर आणि मधुकर मेहकरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे संघटक अजय सावंत यांनी केले.
या कार्यक्रमात सोलापुरातून प्रदेश संघटक दीपक वाडदेकर, माजी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, सोलापूर संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष संभाजी राजे भोसले, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष विक्रांत वानकर, नितीन खटके, शनी घुले, सुहास पोळ, शेखर भोसले, शिरीष जगदाळे, सतीश वावरे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
..... चौकट.....
काय होते ते ऐतिहासिक आंदोलन ?
23 जानेवारी 1962 रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या हस्ते संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा ब्रॉन्झचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, गडकरींनी आपल्या नाटकात शंभूराजांना 'व्यसनी व बदफैली' दाखवून इतिहास मलिन केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने हा पुतळा हटवण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडे सलग आठ वर्षे पाठपुरावा केला होता.
अखेर, पालिकेकडून कोणतीही कारवाई न झाल्याने 02 जानेवारी 2017 साली पहाटे 05 च्या सुमारास हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, स्वप्निल काळे आणि गणेश कारले या चार तरुणांनी उद्यानात प्रवेश केला. त्यांनी हा पुतळा हटवून थेट शेजारी वाहणाऱ्या मुठा नदीच्या पात्रात विसर्जित केला. त्यांच्या संघर्षामुळेच शंभूराजे आसनस्थ झाले !'
