सोलापूर : दिवस गेलेल्या महिलेचे सिझरचे ऑपरेशन करताना यशोधरा हॉस्पीटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे सौ. अर्चना अनिल खडके हिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या कारणीभूत असलेल्या डॉक्टर प्रदीप पाटील यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृताचा पती अनिल मच्छिंद्र खडके यांनी उर्वरित कुटुंबासह येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे.
धाराशिव जिल्हा, परंडा तालुक्यातील शिराळा (ढो) येथील अर्चना अनिल खडके हिला दिवस गेल्यानं तपासणीसाठी 23 डिसेंबर 2025 रोजी कुर्डूवाडी येथील संतोष हॉस्पिटल (स्त्री रोग तज्ञ) येथे नेण्यात आलं होतं. डॉ. संतोष दोशी यांनी सोनोग्राफी करण्यासाठी सांगितल्यावर शहरातील आर्शीवाद हॉस्पीटल येथे सोनोग्राफी करण्यात आली. त्या रिपोर्टनुसार गर्भ खराब आहे, असं सांगून गर्भ खाली करण्यासाठी सुचवण्यात आले होते.
त्यानंतर सौ. खडके पतीसह कुर्डूवाडीतील डॉ. बाहूबली दोशी यांच्याकडं तपासणीसाठी गेल्या असता, डॉ. दोशी यांनी त्यांच्या हॉस्पीटलमधील सोनोग्राफी तपासणी केल्यानंतर बाळाचे ठोके व बाळ चांगले आहे. तुमचा सोनोग्राफीचा रिपोर्ट चांगला आहे, असं डॉ. बाहूबली दोशी यांनी सांगितले. 
त्याप्रमाणे सौ. अर्चना हिने डिसेंबर-2025 ते मार्च 2026 पर्यंत या कालावधीत डॉ. बाहूबली दोशी यांच्या सांगण्यानुसार उपचार घेतले. त्यानंतर डॉ. बाहूबली दोशी यांनी, 18 मार्च 2026 रोजी आर्शिवाद हॉस्पीटल येथे पुन्हा सोनोग्राफी करण्यास सांगितले. तो रिपोर्ट खराब असल्याने डॉ. दोशी यांनी गर्भ बाधित असल्याचं सांगून यशोधरा हॉस्पीटल मधील डॉ. प्रदीप पाटील यांच्याकडे अर्चनाला घेऊन जाण्यास सांगितले.
प्रारंभी पेशंट बाळ चांगले आहे म्हणून सांगणारे डॉ.बाहुबली दोशी यांना आता सोलापूरला जाण्यास सांगता अशी विचारणा केली असता त्यांनी या दांपत्याला अरेरावीची भाषा वापरत हॉस्पिटलमधून हाकलून दिले.
त्यानंतर सौ. अर्चनाला यशोधरा हॉस्पीटलचे डॉ. प्रदीप पाटील यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी M.R.I. काढून आणण्यासाठी सांगितले. परंतु कशाचा काढायचा ते सांगितले नाही, मात्र M.R.I. रिपोर्ट खराब असल्याने त्यांनी तात्काळ सिझर करण्यासाठी सांगितले. 
पेशंट चांगला चालता बोलता असणारे तसेच पेशंटची कुठलीही गंभीर स्थिती नसतानाही डॉ. प्रदीप पाटील यांनी दोन दिवसांनी, 24 मार्च 2026 रोजी अॅडमिट करुन घेऊन दिनांक 25 मार्च रोजी पेशंट अर्चना हिचे सिझर ऑपरेशन करीत असताना अर्चना व तिच्या गर्भात असणाऱ्या बाळाचाही मृत्यू झाला, असं डॉ. प्रदीप पाटील यांनी अनिल खडके यांना सांगितले.
डॉ. पाटील यांनी मृत्यू कशाने झाला हे सांगण्यास टाळाटाळ केली आणि मृत्यू कशाने झाले, हेच त्यावेळी सांगितले नाही. मृत अर्चना खडके हिचे पोस्ट मार्टम न करता तिचं प्रेत नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले.
यशोधरा हॉस्पीटलमधील डॉ. प्रदीप पाटील हेच या मृत्यू प्रकरणास जबाबदार असून त्यांचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यामुळे त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल व्हावा, त्याचबरोबर कुर्डूवाडी येथील डॉ. बाहूबली दोशी सौ. अर्चना खडके हिच्यावर चुकीच्या व तिच्या नवऱ्याची दिशाभूल करुन उपचार करण्यास भाग पाडले. त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा, या न्याय्य मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोरील प्रवेशद्वारावर मंगळवारी सकाळपासून 19 मे रोजी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.
