पुणे : शहरातील काशीवाडी भागात एका चाळीशीतील अविवाहित मुलीने आपल्या ७० वर्षीय वडिलांची चाकूने भोसकून हत्या केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. वारंवार होणारी शिवीगाळी आणि त्रासाला कंटाळून मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात पुढं आलं आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीत मुलीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैनुदिन दस्तगीर फुलारी (वय-70 वर्षे, रा. काशीवाडी, पुणे) असं खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर दिलशाद जैनुदिन फुलारी (वय- 40) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीत मुलीचं नाव आहे. दारूचे व्यसन आणि रोजचा वाद हत्येचं कारण ठरल्याचं बोललं जात आहे.
जैनुदिन यांना दारूचे तीव्र व्यसन होते. ते रोज दारू पिऊन घरी येत असत आणि आपली अविवाहित मुलगी दिलशाद हिला कारणाशिवाय शिवीगाळ करत, तसेच मानसिक व शारीरिक त्रास देत असत. यामुळे घरात रोजच वाद होत होते.
रविवारी रात्री कडाक्याचे भांडण आणि...
नेहमीप्रमाणे रविवारी रात्रीही जैनुदिन हे दारूच्या नशेत घरी आले. त्यानंतर त्यांनी मुलगी दिलशादसोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागले. रोजच्या या त्रासाला कंटाळलेल्या दिलशादचा संयम सुटला आणि रागाच्या भरात तिने घरात असलेला कांदा कापायचा धारदार चाकू उचलला. काही समजण्याच्या आत तिने वडिलांच्या छातीवर जोरदार वार केले. हा वार इतका भीषण होता की, गंभीर जखमी झालेल्या जैनुदिन यांचा जागीच मृत्यू झाला.
खडक पोलिसांकडून गुन्हा दाखल, आरोपी कोठडीत
या घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जैनुदिन यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी खडक पोलिसांनी हत्येचा (खून) गुन्हा दाखल केला असून, आरोपी मुलगी दिलशाद फुलारी हिला अटक केलीय. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
