14 मे ला शासकीय सुट्टी आणि संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहासाचा करावा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश
सोलापूर : महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, 14 मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदीप्यमान इतिहास शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात येऊन सर्वच शासकीय-निमशासकीय शाळा महाविद्यालयांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन व ई-मेलद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं करण्यात आली.
उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी संभाजी ब्रिगेडच्या निवेदनाची तात्काळ दाखल घेत आज तातडीने सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात यावी, असं परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती दिली.
महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन विभागाच्या वतीने सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणे बंधनकारक आहे, असं असताना देखील अनेक शासकीय आणि निमशासकीय कार्यालय मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली नाही. अनेक कार्यालयांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा सुद्धा उपलब्ध नाही. 
केवळ लोकसहभागातून नव्हे तर प्रशासकीय पातळीवर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचे विचार पोहोचावेत, त्यामुळे आपण सोलापूर विभागातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय यांना छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त कार्यालयात अभिवादन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी करण्यात आली.
