कारखान्याच्या प्लायवूड कटींगच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास ! महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर ब्लड कॅन्सर पेशंटचं 21 मे पासून आमरण उपोषण

shivrajya patra

सोलापूर : नागरी वस्तीत सुरू असलेल्या रॉयल प्लायवूड अॅन्ड डोअर्सचा कारखान्यामुळं मुस्लिम पाच्छा पेठेतील नागरिकांचं जगणं मुश्किल झालं आहे. कारखान्याशेजारील रहिवासी भागनगरी मोहम्मद शरीफ वलियोद्दीन यांनी कारखान्याच्या त्रासाला कंटाळून तो बंद करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी, 21 मे पासून महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचं निवेदन आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवलं आहे.

मुस्लिम पाच्छा पेठेतील भागनगरी मोहम्मद शरीफ यांच्या राहत्या घराशेजारी रॉयल प्लायवूड अॅन्ड डोअर्सचा कारखाना या वर्षात नव्याने सुरू करण्यात आला आहे. नागरिकांची मते जाणून घेण्यापूर्वी महानगरपालिकेने नागरी वस्तीत या कारखान्याला परवानगी दिलीच कशी ? असा या परिसरातील नागरिकांबरोबर भागनगरी मोहम्मद शरीफ यांची तक्रार आहे. या कारखान्यात दिवसा-रात्री उशीरापर्यंत प्लायवूड कापण्याचं काम सुरू असते. 

कारखान्यातील दिवस-रात्र चाललेल्या प्लायवूड कटींग कर्णकर्कश आवाजामुळे सामान्य नागरिकांचं जगणं मुश्किल झालं  आहे. या त्रासाला कंटाळलेले भागनगरी मोहम्मद शरीफ, गेल्या दोन महिन्यापासून सोलापूर महानगरपालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत, मात्र महानगरपालिकेचे आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या व्यथेकडे अद्याप डोळसपणे पाहिलेले नाही.

प्लायवूड कटींगच्या कर्णकर्कश आवाजामुळं घरातील एकमेकांशी बोलताना कोण काय म्हणतो, हेही ऐकू येत नाही. घरातील काम करताना, वाचताना वगैरे आवाजाचा भयंकर त्रास होत आहे. त्यातच मी ब्लड कॅन्सरचा पेशंट असल्यानं हा त्रास असह्य होत आहे, असं भागनगरी शरीफ यांचं म्हणणं आहे.

या कारखान्याच्या कर्णकर्कश आवाजाला वैतागून गेल्या दीड महिन्यापूर्वी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना रीतसर अर्ज देऊन महाराष्ट्र दिनी, 01 मे रोजी चौथे निवेदन दिले. त्यावर कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. महानगरपालिकेचे अधिकारी या कारखान्याला बंद करण्यासाठी काही हालचाल करीत नसल्याने भागनगरी मोहम्मद शरीफ यांनी, 08 मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून या कारखान्याला कायमस्वरूपी कुलूप लावण्याची मागणी केली.

शेवटचा पर्याय म्हणून, भागनगरी मोहम्मद शरीफ यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंबंधी पोलिस आयुक्तालय आणि संबंधित पोलीस ठाण्यालाही कळविलं आहे. हे उपोषण 21 मे रोजी सुरू होत असून माझं काही बरे-वाईट झाले तर त्यास केवळ आयुक्त साहेब आणि त्यांच्या ऑफिसमधील सर्व अधिकारी सहकारी आणि कर्मचारी जबाबदार असतील, असंही भागनगरी यांनी म्हटलं आहे. 

*****आजवर माहितीस्तव प्रत सादर :

1) मा. आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

2) मा. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर.

3) मा. पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर.

4) मा. तहसिलदार/कार्यकारी दंडाधिकारी, उत्तर तहसिल कार्यालय, सोलापूर

5) मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर

6) मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जेलरोड पोलीस स्टेशन, सोलापूर

7) मा. झोन अधिकारी, झोन नं.07 डफरीन हॉस्पीटल, सोलापूर.

8) मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, 

मंत्रालय, मुंबई - 32 (महाराष्ट्र राज्य)

To Top