सोलापूर : शहर गुन्हे शाखेकडील मुकेश गायकवाड पोलीस उप-निरीक्षक व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्रीशंकर याला ताब्यात घेतल्यावर घरफोडीच्या गुन्ह्यातील जवळपास 9 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या पथकाला घरफोडीचा गुन्हा 48 तासात उघडकीस आणण्यात यश आलंय. त्यास न्यायालयासमोर उभं केलं असता, न्यायालयानं आरोपीस 04 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयाजवळील गीता नगरातील रहिवासी श्रीमती रेवती सिध्देश्वर तमशेट्टी (वय - 63 वर्षे) या 11 मे रोजी त्यांच्या घरास कुलुप लावून सहपरिवार परगावी गेल्या होत्या. अज्ञात चोरट्यानं त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे 09, 57,000 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरुन नेले. या प्रकरणी 14 मे रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या घरफोडीच्या घटननेचे गांर्भिय ओळखून गुन्हे शाखेकडील तपास पथकांनी गुन्ह्याचे घटनास्थळास भेट दिली. त्यानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखेकडील तपास पथके या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत होते. 
दरम्यान पो.उप. निरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकानं सि.सि.टी.व्ही. फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयीत आरोपी बाबत माहिती प्राप्त केली. त्या अनुषंगाने नमूद पथक संशयीत आरोपीचा शोध घेत असताना शुक्रवारी, 15 मे रोजी 00:18 वा. चे सुमारास मार्केट पोलीस चौकी समोरील सार्वजनिक रस्त्यावर एक सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार संशयितरित्या थांबल्याचे दिसून आले.
त्यावेळी पो. उप. निरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर स्विफ्ट गाडीस शिताफीने घेराव घालून गाडीमध्ये ड्रायव्हिंग सिटवर असलेल्या संशयीतास ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनं त्याचं नाव शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्रीशंकर (वय-48 वर्षे, राहणार घ. नं. 10-284/4 सत्यनारायण कॉलनी रोड नंबर 01, नागारम केसर मंडल, जि. मल्काजगीरी, राज्य तेलंगना) असं असल्याचं निष्पन्न झालं. तसेच त्या स्विफ्ट कारच्या तपासणीमध्ये डॅश बोर्ड ड्रॉव्हरमध्ये सोन्या-चांदिचे दागिने व रोख रक्कम आढळली. 
त्याबाबत अधिक कसून चौकशी केली असता, ते सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम त्यानं जुळे सोलापूर येथे 02 दिवसापूर्वी रात्रीच्यावेळी केलेल्या घरफोडीतील असल्याचे निष्पन्न झाले. शिवप्रसाद याच्या ताब्यातून एकूण 8.2 तोळे सोन्याचे, 30 तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कमेबरोबर गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 8,72,000 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून हा गुन्हा कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे 48 तासांच्या आत उघडकीस आणला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) तथा प्रभारी पोलीस आयुक्त गौहर हसन, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पोलीस उप-निरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अजिंक्य माने, काशिनाथ वाघे, चालक सतिश काटे, बाळासाहेब काळे, तसेच सायबर पो.स्टे कडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड व रतिकांत राजमाने यांनी पार पाडली.
... चौकट ...
शिवप्रसाद याच्याविरुद्ध विविध राज्यात 35 गुन्हे दाखल
आंतरराज्यीय आरोपी शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्रीशंकर याच्यावर विविध राज्यामध्ये एकूण 35 घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
