दक्षिण सोलापूर/15 : शेतकरी संघटनेचे नेते, कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि धोत्री येथील श्री नागनाथ महाराजांच्या पवित्र परंपरेचे गादीपती शिवानंद नागनाथ दरेकर यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा धोत्री येथील त्यांच्या राहत्या घरापासून उद्या (शनिवारी) सकाळी नऊ वाजता निघणार असल्याचं सांगण्यात आलंय.
शिवानंद दरेकर, श्री नागनाथ महाराजांच्या परंपरेतील पाचवे वंशज होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अध्यात्म, समाजसेवा, शेतकर्यांविषयीची तळमळ आणि सर्वसामान्यांप्रती अपार प्रेम यांचा सुंदर संगम होता. बार्शीचे श्री दहिवडकर महाराज यांचे शिष्यत्व लाभलेले दरेकर यांचा सर्व विषयांवर सखोल अभ्यास होता. अध्यात्मासोबत समाजकारण जपणारे त्यांचे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते.
शेतकर्यांच्या प्रश्नांविषयी दरेकर यांना तळमळ होती. शेती आणि शेतकर्यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडून त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. राज्य ऊस नियंत्रण समितीवर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त अॅड. आर. एस. पाटील यांचे ते मेहुणे होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, विवाहित दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
