सोलापूर : गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा, मारामारी करणे, खुल्या प्लॉटची व घर बांधकामाची खोटी कागदपत्रे बनवून सामान्य जनतेची घरजागा जबरदस्तीने बळकावणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यासारखे अनेक गुन्हे दाखल असलेल्या नागेश शिवलिंग कोरे (वय- 53 वर्षे) याला पोलीस आयुक्तालयाकडून सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्ह्यातून ०२ वर्षाकरीता तडीपार करण्यात आलंय.
येथील कुमठा नाका म्हैत्रे वस्तीतील रहिवासी नागेश कोरे याच्याविरुध्द सोलापूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस ठाण्यात सन 2017, 2021, आणि 2025 या कालावधीमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
त्याच्याविरुध्द एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56 (1) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर यांनी कार्यवाही करुन शनिवारी, 23 मे रोजी नागेश शिवलिंग कोरे यास सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार केलं आहे.
