फारूक सय्यद यांना मी एका कणातून सूर्य बनताना पाहिले आहे : अय्यूब अहमद नल्लामंदू

shivrajya patra

दिवंगत फारूक सय्यद यांना उर्दू घर आणि इंडियन युथ असोसिएशनतर्फे श्रद्धांजली 

सोलापूर : जग फारुख सय्यद यांची आज उंच भरारी पाहत आहे. मी त्यांना एका कणातून सूर्य बनताना पाहिले आहे. त्यांनी हे स्थान आपल्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने मिळवले आहे. मी याचा साक्षीदार आहे. मला दुःख आहे की बालसाहित्याचा तेजस्वी तारा मावळला आहे, या हृदयस्पर्शी शब्दात इंडियन युथ असोसिएशनचे संथापक, दिवंगतांचे सहकारी आणि शोकसभेचे अध्यक्ष अय्यूब अहमद नल्लामंदू यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

निमित्त होते ... बालसाहित्याचे प्रणेते, प्रख्यात पत्रकार, उर्दूचे सेवक आणि साहित्य विश्वातील एक अत्यंत सक्रिय व गतिमान कार्यकर्ते गुल बुटे " चे संपादक दिवंगत फारूक सय्यद यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित शोकसभेचे ! 

सोलापूर उर्दू घर आणि इंडियन युथ असोसिएशन तर्फे ज्येष्ठ उर्दू मराठीचे साहित्यिक व पत्रकार अयुब अहमद नल्लामंदू यांच्या अध्यक्षतेखाली एका शोकसभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला उर्दू घरचे सदस्य महमूद नवाज, डॉ. हारून रशीद बागबान, डॉ. मुहम्मद शफी चोबदार, अब्दुल मजीद शेख, मुहम्मद अयाज, पत्रकार गफूर शेख, इंडियन युथ असोसिएशनचे उपाध्यक्ष अबुबकर नल्लामंदू, मजहर अल्लोळी, अस्लम सय्यद, जमात-ए-इस्लामीचे सदस्य खलील अहमद बानकारी, सिराज शेख, प्रोग्रेसिव्ह उर्दू स्कूलचे  जाफर बांगी, माजी प्राचार्य  डॉ. सिराज मोमीन, अन्वर होटगीकर  आणि इम्रान इनामदार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

उर्दू घरचे सदस्य महमूद म्हणाले की, मी दिवंगत फारूक सय्यद यांच्यासोबत बराच काळ काम केले आणि अनेक कार्यक्रम आयोजित केले. मी त्यांच्याकडून मंचावर बोलण्याचे कौशल्य शिकलो. इम्रान इनामदार म्हणाले की, मी त्यांच्याकडून पत्रकारिता शिकलो, ते माझे शिक्षक होते. जाफर बांगी म्हणाले की, मला त्यांच्याकडून नाटकात काम करण्याची प्रेरणा मिळाली. मी त्यांच्यासोबत अनेक नाटकांमध्ये काम केले. प्राचार्य डॉ. हारून रशीद बागबान म्हणाले की, फारुख सय्यद यांचं कार्य सोलपूरपुरते मर्यादित नव्हते, उलट 'उर्दू मेला' च्या आयोजनातून सोलापूर चं नांव जगात पसरविले. गायक सदस्य मुहम्मद अयाज म्हणाले की, दिवंगतांमुळेच मला मुंबईत अनेक कार्यक्रमांची प्रेरणा मिळाली.

रत्नागिरीचे माजी प्राचार्य डॉ. सिराज मोमीन यांनी त्यांना उर्दूचे जनक म्हटले आणि जागतिक व्यक्तिमत्व म्हणून घोषित केले. सोलापूर उर्दू घरचे व्यवस्थापक साहिर नदाफ म्हणाले की, दिवंगत हे पानगल उर्दू शाळेच्या ग्रंथालयातील एक आदर्श वाचक होते. पुस्तकांचे वाचक म्हणून ते मला मनोरंजक वाटले. 

कार्यक्रमाच्या शेवटी, सोलापूर उर्दू घरने त्यांच्या क्षमेसाठी प्रार्थना केली आणि शोकसंदेश मंजूर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. डॉ. मुहम्मद शफी चोबदार यांनी केले तर उर्दू घरचे सदस्य महमूद नवाज यांनी आभार प्रदर्शन केले.

To Top