डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचा पुढाकार; कर्तृत्ववान भिमपुत्रांचा स्नेहमेळावा आणि गौरव

shivrajya patra

 

मुरूम : इथल्या भीमनगर या मागास वस्तीतून वर्ग एक व वर्ग दोनचे आजवर तब्बल 47 अधिकारी घडले आहेत. राज्याच्या उच्च प्रशासकीय सेवेत त्यांनी मारलेली गगनभरारी आजच्या पिढीसाठी यशाची ब्लु प्रिंट ठरत आहे. मंगळवारी, 28 एप्रिल रोजी सायंकाळी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते या कर्तृत्ववान भिमपुत्रांचा गौरव करण्यात आला.

सत्कार सोहळ्याचं निमित्त होतं, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरूम इथल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळ्याचं ! यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने उमरगा तालुक्यातील मुरूम परिसरातील काळ्या मातीतून प्रशासनाला अनेक कर्तृत्ववान अधिकारीही बहाल केले आहेत. 

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शहरातील भीमनगरातून वर्ग एक व वर्ग दोनचे आजवर तब्बल 47 अधिकारी घडले. त्यांच्या संघर्षमय वाटचालीचा गौरव करण्यासाठी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. निवृत्त साखर सहसंचालक डी. आय. गायकवाड स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी नगराध्यक्ष बापुराव पाटील, राजस्थानच्या राज्यपालांचे विशेष कार्यअधिकारी राजकुमार सागर, अप्पर निबंधक राजेश सुरवसे, बीपीसीएलचे निवृत्त चीफ मॅनेजर सिद्धेश्वर भालेराव, मुंबई विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख दत्तात्रय मुरूमकर, कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अशोक गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बोधिसत्व गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते जयंती मंडळाच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या "यशस्वी शिलेदार" या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी डी. आय. गायकवाड, राजकुमार सागर, राजेश सुरवसे, सिद्धेश्वर भालेराव, प्रा. दत्तात्रय मुरूमकर, अशोक गायकवाड यांनी डॉ. आंबेडकर शहर वाचनालयाचा उल्लेख करून जुन्या आठवणींना उजाळा देत उपस्थित युवकांना स्पर्धा परीक्षा,नौकरीच्या संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मदन गायकवाड यांनी प्रस्तावित करून आभार मानले. जयंत गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नगरसेवक रुपचंद गायकवाड,उपाध्यक्ष अमोल बनसोडे, कोषाध्यक्ष प्रा. अण्णाराव कांबळे, सचिव आनंद गायकवाड, प्रशांत गायकवाड, राहुल गायकवाड, अभिजित कांबळे, प्रबुद्ध गायकवाड, प्रशांत मुरूमकर, प्रवीण गायकवाड, प्रा. साधू गायकवाड, दिनेश भालेराव, अजिंक्य गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले.

.....चौकट

मुरूमचं भीमनगर म्हणजे हिऱ्यांची खाण !

मुरूम शहरातील भीमनगर येथून वर्ग एक व वर्ग दोनचे तब्बल 47 अधिकारी घडले, याचा समस्त मुरूमकरांना अभिमान आणि गर्व आहे. आज या वस्तीतील अनेक युवक-युवती उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय अधिकारी म्हणून आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. म्हणूनच मुरूमच्या भीमनगरची ओळख अधिकाऱ्यांची खाण म्हणून निर्माण झाली आहे. असं माजी मंत्री बसवराज पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

खऱ्या अर्थाने भीमनगरला अधिकाऱ्यांची खाण म्हणावे लागेल, असे सांगत यापुढील काळात शिक्षण, समता व बंधुता या मूल्यांना अधिक सक्षम करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वसमावेशक व भव्य-दिव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षाही माजी मंत्री पाटील यांनी व्यक्त केली.

To Top