रानवेध फाऊंडेशन, आम्ही मंद्रूपकर टिमची विधायक कृतीशीलता
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील रानवेध फाऊंडेशन आणि आम्ही मंद्रूपकर टिमच्या सदस्यांनी समाजाला दिशादर्शक उपक्रमाने धुळवड साजरी केली. गेल्या 05 वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातोय. उभय संघटनांच्या सदस्यांनी हाती खराटा घेत हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता करीत विधायक कृतिशीलता जपली.
मागील 05 वर्षांपासून धुळवडीस स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. या उपक्रमात 'आम्ही मंद्रूपकर' उपक्रमातील युवक स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतात. दहनशेडमधील राख झाडांना घालून परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. काटेरी झाडी-झुडपांनी वेढलेली बसस्थानक परिसरातील हिंदू स्मशानभूमी काही तासांमध्ये स्वच्छ झाली. झाडून गोळा करण्यात आलेला दहा गाड्या कचरा-पालापाचोळा गोळा करून खत निर्मिती प्रकल्पास पाठविण्यात आला.
मंगळवारी, 03 मार्च रोजी सकाळी 06:30 वाजता स्वच्छता मोहिमेस सुरवात झाली. तरुणांनी हातामध्ये खराटा घेऊन स्मशानभूमी स्वच्छ करण्यास सुरवात केली. काहींनी काटेरी झुडपं तोडायला सुरु केले. तासाभरात 15 ते 20 युवक जोडले गेले. स्वच्छता विभागाचे कर्मचाऱ्यांनी सहभागी झाले.
मुकेश खराडे यांनी स्वच्छता मोहिमेसाठी शेत-शिवारातून तुरीच्या काड्या गोळा करून स्वत: खराटे तयार केले. विकास शिळ्ळे, जगन्नाथ खरात यांनी दहनशेडमधील राख झाडांभोवती टाकून शेडची स्वच्छता केली. सिद्धेश्वर नंदुरे, सचिन साठे यांनी दहन शेडची स्वच्छता केली. परिसर झाडून स्वच्छ केला.
रवी केवटे यांनी अंत्यस्कारासाठी वापरलेले बांबूचा झाडांना आधार दिला. श्याम गोसावी, अक्षय झेंडेकर, नितीन खराडे यांनी स्मशाभूमीतील कचरा, इतर अनावश्यक वस्तू जाळून परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेत अवघ्या 08 वर्षांचा रितुल गोसावी आणि 11 वर्षीय तनुजा केवटे या चिमुकल्यांनी खराटा हाती घेऊन स्मशानभूमीची स्वच्छता केली.
मागील पाच वर्षांपासून सातत्याने सुरु असलेल्या स्मशाभूमी स्वच्छता अभियानाची प्रेरणा इतर गावांतील युवक मंडळांंनी घेतली आहे. त्या गावातील युवक, तरुण मंडळ मंद्रूपच्या युवकांची प्रेरणा घेऊन स्वत:च्या गावातील स्मशाभूमीची स्वच्छता करून गावामध्ये विधायक कृतीशीलता जपत आहेत.
---- ग्रामपंचायतीचे योगदान
गावातील युवकांनी स्मशानभूमीची स्वच्छता मोहिम सुुरु केल्याचे समजताच माजी सभापती अप्पाराव कोरे, ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मदतीसाठी पाठविले. महिला सफाई कामगारांसह, लिपीक अमोल बाळगी, सतीश म्हेत्रे, वाहन चालक चाँद शेख आदी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांंनी या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला.
... यांनी घेतला पुढाकार !
नितीन खराडे, मुकेश खराडे, सचिन साठे, रवी केवटे, जगन्नाथ खरात, विनोद कामतकर, रितूल गोसावी, तनुजा केवटे, ओंकार झेंडेकर
---- कोट - १
एकजुटीने विधायक काम
गावातील युवकांनी एकजुटीने धुळवडीला स्मशाभूमीची स्वच्छता केली. ही विधायक उपक्रमाची सुरवात असून भविष्यात आणखी लोकसहभागातून विधायक उपक्रम राबवण्यात येतील.’’
- जगन्नाथ खरात
----- कोट- २
... गावही स्वच्छ होऊ शकते !
धुळवड निमित्ताने स्मशानभूमी स्वच्छ करण्याची संकल्पना रानवेध फाऊंडेशनने मांडली. ‘आम्ही मंद्रूपकर’ म्हणून त्यास प्रतिसाद दिला. एकजुटीतून स्मशाभूमीही स्वच्छ झाली असून संपूर्ण गावही स्वच्छ होऊ शकते, हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.’’
श्याम गोसावी, युवक, मंद्रूप
