सोलापूर : प्रस्ताव तयार करुन तो तहसिलदाराकडून मंजूर करून त्यासंबंधीचा आदेश काढण्यासाठी १७ हजार रुपयांची लाच मागून ती स्विकारल्याच्या जाळ्यात महिला तलाठी सापडली. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात येण्यापूर्वीच हे आरोपी ०३ वेळा निसटले होते. एसीबीच्या पथकाच्या चौथ्या सापळ्यात हे सावज रंगेहाथ गवसले. याप्रकरणी तलाठी श्रीमती ऐश्वर्या शिरामे आणि महसुल सहाय्यक रविंद्र भड यांच्याविरुध्द बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे आलेल्या शेतजमीनीचा महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये वाटप पत्र होऊन त्यांच्या मुलाचे नावे होणेकरीता बार्शी तालुक्यातील तलाठी कार्यालय ताड सौंदणे यांच्याकडे ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्ज सादर केला होता.
या अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदार पाठपुरवा करत असताना लोकसेवक तलाठी श्रीमती ऎश्वर्या शिरामे यांनी सादर केलेल्या अर्जावरुन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये महसूल प्रस्ताव तयार करुन तो तहसिलदाराकडून मंजूर करून त्यासंबंधीचा आदेश काढण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली.
याप्रकरणी तक्रारदाराने सोलापूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल केल्यावर 25 फेब्रुवारी 2025 रोजी पडताळणी होऊन दुसऱ्या दिवशी एसीबीच्या पथकानं सापळा रचला, मागणीप्रमाणे २० हजार रूपयांऐवजी ठरलेले १७ हजार घेण्यासाठी तलाठी न आल्याने ती कारवाई निष्फळ ठरली. एसीबी च्या पथकाने बदलत्या तारखाप्रमाणे २७ फेब्रुवारी दुसऱ्यांदा आणि १८ मार्च रोजी तिसऱ्यांदा सापळा रचला, मात्र लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी ऐनवेळी कोणी पुढं न आल्याने तिन्ही प्रयत्न निष्फळ ठरले.
तरीही एसीबीच्या पथकानं जिद्द सोडली नव्हती, तक्रारदाराकडं ठरलेल्या रक्कमेची मागणी झाल्यानं, ०३ एप्रिल रोजी चौथ्यांदा सापळा रचण्यात आला. त्यात तक्रारदाराकडून तलाठी श्रीमती ऎश्वर्या शिरामे यांनी स्वतःच्या इतरांच्या फायद्याकरिता १७ हजार रुपयांची लाच स्विकारल्यानं रंगेहाथ पकडण्यात आलं. या लाच मागणीस लोकसेवक महसूल सहाय्यक रविंद्र भड (तहसिल कार्यालय, बार्शी) यांनी श्रीमती ऐश्वर्या शिरामे यांचे लाच मागणीस संमती तसेच प्रोत्साहन देऊन बेकायदेशीर वर्तन केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी तलाठी श्रीमती ऐश्वर्या धनाजी शिरामे (रा. अंबिका गृहनिर्माण सोसायटी, परांडा रोड, बारंगुळे प्लॉट, बार्शी) आणि महसुल सहाय्यक रविंद्र आगतराव भड (रा. अरीहंत बोपलकर हॉस्पीटल समोर, देवकर प्लॉट, बार्शी) यांच्याविरुध्द बार्शी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७, ७ अ, १२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय.
ही कारवाई पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार पोहेकॉ/अतुल घाडगे, पोहेकॉ सलिम मुल्ला, पोना/स्वामीराव जाधव, मपोकॉ/ प्रियंका गायकवाड, चापोह/राहुल गायकवाड, चापोशि/शाम सुरवसे (सर्व नेम. ला.प्र.वि., सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.