वृद्ध कलावंतांची होतेय ससेहोलपट; मानधनासाठी नामदार शेलार यांना निवेदन

shivrajya patra
 
सोलापूर : जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांचे मानधन गेल्या चार वर्षापासून रखडले आहे. निवड समितीची ही बैठक झाली नाही. जिल्ह्यातील अकरा पंचायत समितीच्यामार्फत वृद्ध कलावंतांचे अर्ज मागवले जातात, मात्र त्यांना मिळत काहीच नाही. ज्या कलेच्या जीवावर आजपर्यंत जगता आले. त्याच कलाकाराला आयुष्याच्या संध्याकाळी सुखाने दोन घास खाता यावे, म्हणून या कलाकारांना मानधन देण्याबाबत त्वरित बैठकीचे आयोजन करून सोलापूर जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशा आशयाचं निवेदन मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) येथील कलावंत बाळासाहेब रामचंद्र हारदाडे यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना दिले.

हारदाडे यांनी आपल्या निवेदन म्हटलं आहे की, मानधन मिळविण्याकरता कलाकारांनी शासनाच्या साईटवरती ऑनलाईन अर्ज करावेत असे सांगितले जाते, मात्र गेल्या अनेक महिन्यापासून ही साईटच बंद आहे. जून जुलैमध्ये ही साईट ओपन होईल, असं पंचायत समितीमधून सांगितलं जातंय. 

साईट बंद असल्यामुळे ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात नाहीत. आणि ऑफलाईन अर्ज घेतले जात नाहीत. त्यामुळे वृद्ध कलावंत दुहेरी संकटात सापडले आहेत. पंचायत समितीकडे गेलं की, ऑनलाईन भरा म्हणतात आणि ऑनलाइन भरायला गेले की साईट बंद आहे, म्हणून सांगितलं जात. 

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे चौकशी केली असता, अजून साईट ओपन व्हायला वेळ आहे, नंतर या असं सांगितलं जातं. त्यामुळे वृद्ध कलावंतांची ससेहोलपट होत आहे. कलाकारांच्या मानधनाची बैठक आयोजित करण्याकरिता सोलापूर जिल्हाधिकारी यांनीही तातडीने लक्ष घालून गेल्या चार वर्षापासून कलाकारांचा रखडलेला प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही हारदाडे यांनी केली आहे.
To Top